मुंबई - यंदाच्या बिग बॉस मराठीचं पर्व बरंच गाजलं. रितेश देशमुखनं होस्ट केलेला हा शो बारामतीच्या सूरज चव्हाण यानं जिंकल्यानंतर तमाम मराठी प्रेक्षकांना आनंद झाला. सूरजचा भोळा आणि निरागस स्वभाव प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्याचा तोतरेपणा हा काही अंशी त्याचा प्लस पॉईंट ठरला तर त्याच्या प्रामाणिक वागण्या बोलण्याची भुरळ कलर्स मराठीच्या चॅनल हेड केदार शिंदेंनाही पडली. सूरज चव्हाणला घेऊन ‘झापुक झुपूक’ हा सिनेमा बनवण्याची घोषणा केदार शिंदे यांनी बिग बॉस विजेता घोषित करतानाच केली होती. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनातली उत्कंठा वाढीस लागणं स्वाभाविक होतं. तर सध्या या चित्रपटाबद्दलचीअपडेट अशी आहे की, ‘झापुक झुपूक’च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
केदार शिंदे दिग्दर्शन करत असलेल्या ‘झापुक झुपूक’ या चित्रपटात सूरज चव्हाणसह लोकप्रिय टीव्ही मालिकेतील अनेक कलाकार झळकणार आहेत. यामध्ये दीपाली पानसरे, पायल जाधव, जुई भागवत, इंद्रनील कामत आणि हमंत फरांदे या कालाकारांचा समावेश असणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचं दीपाली पानसरेनं तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"केदार शिंदे यांच्याबरोबर काम करण्यासाठी खूप दिवसांपासून वाट पाहत होते आणि अखेर तो क्षण आला आहे", असं तिन या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. दीपालीनं दोन फोटो पोस्ट केले असून एकामध्ये ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा क्लॅप बोर्ड दिसत असून त्यावर मुहूर्त असं लिहिण्यात आलंय. तर दुसऱ्या फोटोत दिग्दर्शक केदार शिंदे आपल्या कलाकारांसह फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. त्यांच्या जवळ सूरज चव्हाण उभा असून त्याच्या खांद्यावर त्यांनी प्रेमानं हात टाकल्याचं दिसतंय.
केंदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ या चिपटाची निर्मिती जिओ स्टुडिओजच्या वतीनं ज्योती देशपांडे आणि बेला शिंदे करत आहे. हा चित्रपट येणाऱ्या नव्या वर्षात 2025 मध्ये मोठं आकर्षण ठरू शकतो. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून अवधी असला तरी चाहत्यांमध्ये एका नवा उत्साह या मुहूर्ताच्या बातमीनं निर्माण झाल्याचं पोस्टवरील प्रतिक्रियावरुन दिसत आहे.