अस्ताना : राजधानी बाकूहून रशियातील ग्रोझनीला जाणारं अझरबैजान एअरलाइन्सचं प्रवासी विमान बुधवारी पश्चिम कझाकस्तानमध्ये कोसळलं. कझाकच्या परिवहन मंत्रालयानं बुधवारी ही माहिती दिली.
"बाकू-ग्रोझनी मार्गावर जाणारं विमान अकताऊ शहराजवळ क्रॅश झालं. हे अझरबैजान एअरलाइन्सचं विमान आहे," असं तेथील परिवहन मंत्रालयानं टेलिग्रामवर स्पष्ट केलं. अझरबैजान एअरलाइन्सनं स्पष्ट केलं की, एम्ब्रेअर 190 ने कॅस्पियन समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्यावरील तेल आणि वायू केंद्र असलेल्या अकताऊपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर "इमर्जन्सी लँडिंग" करताना विमान कोसळलं.
कझाकच्या वाहतूक मंत्रालयानं सांगितले की, विमानात 62 प्रवासी आणि पाच क्रू मेंबर्स होते. देशाच्या आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयानं सांगितलं की, त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी आग विझवत आहेत. यातील काही प्रवासी वाचले असल्याचं सांगण्यात येत आहे.
#Azerbaijan Airlines plane coming from #Baku crashes in Aktau, #Kazakhstan pic.twitter.com/bPQer1RnUL
— White Vador ➿ (@AleaJactaEs666) December 25, 2024
स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अपघातातून वाचलेल्या १४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या प्रादेशिक विभागानं एका निवेदनात म्हटलं आहे की, "याक्षणी, 14 वाचलेल्यांना प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यातील पाच जण अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेले आहेत."
घटनेनंतर काही वेळातच या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले. अशाच एका व्हिडिओमध्ये विमान आकाशात घिरट्या घालताना आणि नंतर आगीच्या गोळ्यात रुपांतर होऊन कोसळताना दिसत आहे.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये, या अपघातातील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करताना बचाव पथकातील जवान दिसत आहेत. ते मृतदेह बाहेर काढत आहेत आणि वाचलेल्यांचा शोध घेत आहेत. हा विमान अपघात इतका भयंकर होता की आकाशातच या विमानानं पेट घेतला. तसंच हे पेटलेलं विमान जमिनीकडे झेपावलं.