मुंबई - अभिनेता अक्षय कुमार अभिनीत 'भूत बंगला' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन त्याच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांनाचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 'भूत बंगला'ची घोषणा झाल्यापासून अनेकजण या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहात आहे. 'हेरा फेरी' आणि 'भूल भुलैया'नंतर प्रियदर्शन आणि अक्षय कुमारची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसत आहे. दरम्यान 'भूत बंगला' चित्रपट शूटिंग सुरू झालं आहे. या चित्रपटात अक्षय कुमारबरोबर तब्बू देखील दिसणार आहे. तब्बूनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत. तब्बूनं हे फोटो शेअर करत यावर लिहिलं, 'आपण इथेच बंदिस्त आहोत. सीन नंबर 83, शॉट नंबर 5 आणि टेक नंबर 1.'
'भूत बंगला'2026 मध्ये प्रदर्शित होईल :'भूत बंगला' हा चित्रपट पुढील वर्षी 2026मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. हा चित्रपट प्रियदर्शन बनवत आहेत, ज्यांनी आतापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक विनोदी चित्रपट दिले आहेत. प्रियदर्शनचे चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत नाहीत, तर लोकांची मनेही जिंकतात. याआधी त्यांनी 'भूल भुलैया', 'चुप चुपके' 'मालामाल वीकली' 'हेरा फेरी', 'हलचल', 'भागम भाग', 'हंगामा' आणि 'दे दाना दान' यांसारखे अनेक उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन केलंय. प्रियदर्शनची अक्षय कुमारबरोबरची जोडी अद्भुत आहे. या दोघांनी मिळून प्रेक्षकांना खूप हसवलं आहे. आता पुन्हा एकदा अक्षय कुमार 'भूत बंगला' चित्रपटातून प्रेक्षकांना हसवणार आहे.