मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिनं काँग्रेस पक्षाच्या केरळ युनिटवर सडकून टीका केली आहे. तिचं कर्ज माफ व्हावं म्हणून तिचं सोशल मीडिया अकाऊंट भारतीय जनता पक्षाला दिल्याचा दावा एका पोस्टमध्ये करण्यात आला होता. केरळ काँग्रेसनं खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप प्रीती झिंटानं आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
"अभिनेत्री प्रीती झिंटानं तिचे सोशल मीडिया अकाउंट भाजपला देऊन १८ कोटी कर्ज माफ केलं" असा दावा काँग्रेस पक्षाच्या केरळ युनिटकडून एका सोशल मीडिया पोस्टमधून करण्यात आला होता.
याला उत्तर देताना प्रीती झिंटानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "नाही, मी माझं सोशल मीडिया अकाउंट मी स्वतः हाताळते आणि तुमच्या या फेक न्यूजला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टीबद्दल लाज वाटते. कोणीही माझ्यासाठी काहीही किंवा कोणतंही कर्ज राइट केलेले नाही. मला धक्का बसला आहे की एक राजकीय पक्ष किंवा त्यांचे प्रतिनिधी माझ्या नावाचा आणि फोटोंचा वापर करून खोट्या बातम्यांचा प्रचार करत आहेत आणि वाईट गॉसिप आणि क्लिक बाइट्समध्ये गुंतले आहेत," असं अभिनेत्री प्रीती झिंचानं तिच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"मी नोंदणी झालेलं कर्ज घेतलं होतं आणि ते दहा वर्षापूर्वीच पूर्णपणे परतही केलंय. मला वाटतं की माझं इतकं स्पष्टीकरण आगामी काळात अधिक गैरसमज पसरु नये यासाठी पुरेसं आहे अशी मला आशा वाटते.", असंही ती पोस्टमध्ये पुढं म्हणाली.
त्यानंतरच्या पोस्टमध्ये, माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याची योग्य शहानिशा करण्यात अपयशी ठरलेल्या माध्यमांबद्दल तिची निराशा व्यक्त केली. "खूप चुकीची माहिती पसरली आहे पण सोशल मीडियासाठी आणि X साठी मी देवाचं आभार मानते. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी पाहिले आहे की इतके आदरणीय पत्रकार इतक्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या छापतात आणि तरीही त्या दुरस्त कराव्यात किंवा माफी मागावी असं त्यांना वाटत नाही. मी न्यायालयातही गेले आहे आणि पुढे सुरू असलेल्या केसेस लढण्यासाठी खूप पैसेही खर्च केले आहेत. मला वाटते की आताच त्यांना जबाबदार धरण्याची वेळ आली आहे जेणेकरून भविष्यात काही जबाबदारी येईल. मी निश्चितपणे या सर्व पत्रकारांची नावे सांगण्यास सुरुवात करणार आहे जे अशा स्टोरीज पाठपुरावा किंवा चौकशी न करता लिहितात. जर तुम्हाला माझी प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत नसेल तर माफ करा मी तुमच्या प्रतिष्ठेला महत्त्व देत नाही.", असंही तिनं पुढं म्हटलंय.
प्रीती झिंटानं रोखठोक भूमिका घेत अखेरीस इशारा दिला आहे की, "पुढच्या वेळी कृपया माझे नाव घेण्यापूर्वी मला कॉल करा आणि स्टोरी खरी आहे की नाही ते शोधा. तुमच्याप्रमाणेच, मीही वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करून प्रतिष्ठा निर्माण केली आहे म्हणून जर तुम्हाला माझ्याबद्दल काळजी नसेल तर मला तुमची काळजी नाही."
दरम्यान, कामाच्या आघाडीवर विचार करता प्रीती २०१८ मध्ये भैयाजी सुपरहिट या चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती. आता ती राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'लाहोर १९४७' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये परतण्यासाठी तयार आहे. शबाना आझमी आणि अली फजल यांच्याबरोबर प्रीती झिंटा या आगामी चित्रपटात सनी देओल आणि त्याचा मुलगा करण देओलबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.
हेही वाचा -