महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रजनीकांत, चिरंजीवी, कमल हासनला जे झेपलं नाही ते 'राजकारण' करुन दाखवणार का थलपती विजय?

थलपथी विजयच्या आधी अभिनय सोडून अनेकजण राजकारणात आले, पण मर्यादित यशाच्या पलीकडे त्यांना यश मिळालेलं नाही. विजयला हे यश मिळणार का याची प्रतीक्षा आहे.

Thalapathy Vijay enters politics
थलपती विजय (Etv Bharat)

By ETV Bharat Entertainment Team

Published : 4 hours ago

मुंबई - साऊथचा सुपरस्टार थलपती विजयनं यापूर्वीच राजकारणात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार त्यानं 'तामिळगा वैत्री कळघम' हा पक्ष स्थापन करुन हवा निर्माण केली आहे. यापूर्वी साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून अनेक कलाकार यशस्वी झाले आहेत. पण तो काळ आता राहिलेला नाही. अलीकडे फिल्मस्टार्स राजकारणात येतात परंतु त्यांना दीर्घकाळ यासाठीची मेहनत करण्याची इच्छा राहत नाही. काही वर्षातच अशा पक्षांचं नाव पुसून जातं असा इतिहास राहिला आहे. थलपती विजयला प्रचंड फॅन फॉलोइंग आहे, परंतु याचं राजकारणात कसं रुपांतर होतंय हे पाहावं लागणार आहे.

तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या राजकारणात नेहमी फिल्मस्टार्सची दबदबा राहिला आहे. तामिळनाडूत एमजी रामचंद्रन, जयललीता यासारख्या नेत्यांनी रुपेरी पडदा गाजवल्यानंतर मुख्यंमत्रीपदाची शपथही घेतली होती. आंध्र प्रदेशमध्ये एनटी रामाराव यांनीही सिनेमातून लोकप्रिय झाल्यानंतर तेलगु देशम पक्षाची स्थापना केली आणि मुखमंत्री म्हणूनही कारकिर्द गाजवली. त्यामुळं आपणही राजकारणात यशस्वी होऊ शकता असा विश्वास अनेक साऊथ स्टार्सनी बाळगला. परंतु मर्यादित यशाच्या पलीकडं त्यांची मजल गेली नाही.

आंध्र प्रदेशमध्ये चिरंजीवीनं पक्ष स्थापन करुन हवा निर्माण केली होती. मात्र निधानसभा निवडणुकीत मोजक्या जागा हाताला लागल्यानंतर काही काळ राजकाणात राहून राजकीय अस्तित्व टिकवून ठेवलं होतं. त्यानंतर त्यानं आपला 'प्रजा राज्यम पक्ष' काँग्रेस पक्षात विलीन केला होता. दरम्यान केंद्रमध्ये काही काळ मंत्रीपद मिळवून त्यातच चिरंजीवीला समाधान मानावं लागलं होतं.

तामिळनाडूतही रजनीकांतनं आपला पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. बराच काळ यावर विचार केल्यानंतर ऐनवेळी पक्ष स्थापन करण्याचा आणि राजकारणात न उतरण्याचा निर्णय त्यानं घेतला. त्यामुळं त्याचे चाहते नाराज झाले होते. याच दरम्यान साऊथचा दुसरा सुपरस्टार कमल हासननं 'मक्कल निधी मयेम' या पक्षाची स्थापना करुन विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र जनतेनं या पक्षाला नाकारलं होतं. चिरंजीवीचा भाऊ असलेल्या पवन कल्याण यानं राजकारणात हात आजमवायला सुरूवात केली. 2014 मध्ये त्यानं 'जनसेना' हा पक्ष स्थापन केला. सुरूवातीला राजकारणात अपयश आल्यानंतर त्यानं संयम सोडला नाही. 2024 मध्ये झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणूकीत पक्षाला उत्तम यश मिळालं आणि पवन कल्याण उपमुख्यमंत्री झाला आहे.

साऊथ सुपरस्टार थलपथी विजयबद्दल बोलायचं तर सर्वाधिक मानधन घेणारा हा तमिळ चित्रपटाचा अभिनेता आपलं करियर सोडून स्वतःला राजकारणात ढकलत आहे. अलीकडेच विजयने आपली पहिली राजकीय रॅली काढली, यामध्ये एवढी मोठी गर्दी झाली की प्रेक्षक थक्क झाले. विजय यानं चालू वर्षीच 'तामिळगा वैत्री कळघम' या पक्षाची घोषणा करून राजकारणात प्रवेश केला होता. दरम्यान, विजयनं आता तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची 2026 तयारी केली आहे. विजय राजकारणात कितपत यशस्वी होतो, हे विधानसभा निवडणुकीतून कळेल.

फिल्म इंडस्ट्रीतून लोकप्रिय झाल्यानंतर राजकारणात यशस्वी होण्याची स्वप्नं अनेकांना पडतात. यापूर्वी अमिताभ बच्चन यांनीही अलाहबादमधून निवडणूक लढवून खासदार म्हणून संसदेत एन्ट्री केली होती. शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, कंगना रणौत, रवी किशन, मनोज तिवारी हे अभिनेता सध्याच्या संसदेमध्ये खासदार म्हणून निवडून गेले आहेत. यापूर्वी सुनिल दत्त, जयाप्रदा, स्मृती इराणीसह अनेक अभिनेता आणि अभिनेत्री संसदेच्या अंगनापर्यंत होपोचले होते. आता तमिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय कितपत यशस्वी होणार हे पाहाण्यासाठी अजून बराच काळ वाट पाहावी लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details