मुंबई -बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हल्लेखोरानं दोन कोटी रुपयांची मागणी केली असून पैसे न मिळाल्यास सलमानला मारण्यात येईल असं म्हटलं आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी एक संदेश आला होता, यामध्ये अज्ञात व्यक्तीनं धमकी दिली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं दोन कोटी रुपयांची मागणी केल्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबई पोलीस या व्यक्तीच्या शोधात आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीनं असेही म्हटलं होतं की, 'जर पैसे मिळाले नाहीत तर तो सलमान खानला मारून टाकेल.' हा धमकीचा मेसेज मिळाल्यानंतर वरळी, मुंबई पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉरेन्स बिश्नोईकडून सतत धमक्या :यापूर्वी सलमान खान आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा आमदार मुलगा झीशान सिद्दीकी यांना एक फोन आला होता, यावर देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील 20 वर्षीय तरुणला अटक देखील केली आहे. झीशान आणि सलमान खान या दोघांना धमकावून पैशांची मागणी वारंवार करण्यात येत आहे. सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीनं बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर त्यांनी सलमान खानलाही इशारा दिला होता. आता सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, मात्र तरीही धमक्या येणं सुरूच आहेत.