मुंबई - सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था शिल्लक नसल्याची टीका अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी केली आहे. शिवसेना उबाठा गटाचे युवा नेता आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा आरोप केलाय. अलीकडच्या काही वर्षात राज्यात घटलेल्या घटना चिंताजनक असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
आदित्य ठाकरे यांनी सैफ अली खान बरा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "सैफ अली खानवर झालेला चाकू हल्ला धक्कादायक आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे आणि बरा होत आहे हे ऐकून आम्हाला दिलासा मिळाला आहे. हा कठीण काळ संपून तो लवकरात लवकर सामान्य स्थितीत परत यावा, अशी आम्ही प्रार्थना करतो. असं असलं तरी, हे घडलं ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडवून देणारी आहे. गेल्या ३ वर्षांत हिट अँड रन प्रकरणं, अभिनेते आणि राजकारण्यांना धमक्या देणं आणि बीड आणि परभणीमधील घटनांसारख्या घटनांवरून हेच दिसून येतं की सरकार गुन्हेगारी रोखण्यात आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. आपल्या सरकारमध्ये नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणारा कोणी आहे का?"