मुंबई -शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय नोकरदारांचे हित जपणारा विकसित भारताची पायाभरणी करून देशवासीयांची मन जिंकणारा अर्थसंकल्प आहे. तसेच देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केलं आहे.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आजचा अर्थसंकल्प हा राज्याच्या विकासाकरिता उपयोगी पडणार असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील अर्थसंकल्प पूर्ण अपेक्षांवर उतरलेला आहे. विकसित भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प असल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. 2047 पर्यंतच्या विकसित भारताची पायाभरणी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केले जाणार आहे. गरीब महिला युवक आणि अन्नदाता शेतकरी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य यात देण्यात आलं आहे. कॉर्पस फंडदेखील यात उपलब्ध करून दिला जाणार आहे. संशोधन व विकास या क्षेत्रासाठी नवीन उद्योग यावेत, यासाठीदेखील निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याकरता सरकार एक लाख कोटी रुपयांचा निधी तयार करणार आहे. राज्य सरकारांना सुधारण्यासाठी 75 हजार कोटी रुपयांची 50 वर्षाची व्याजमुक्त कर्ज देण्याची घोषणादेखील करण्यात आली आहे. या सर्व गोष्टी राज्याच्या विकासाकरिता उपयोगी पडणार आहे.
शेतकऱ्यांना बळ मिळणार-पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून 11 कोटी 80 लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत झाली आहे. तर 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक योजनेचा फायदा झाला आहे. आत्मनिर्भर तेलबिया अभियानांतर्गत मोहरी, तीळ, सूर्यफुल, शेंगदाणा, सोयाबीन या तेलबिया देशातच तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न, दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वंकष योजना, राष्ट्रीय गोकुल मिशनसारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना बळ मिळणार आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. देशात 3 हजार नवीन आयटीआय, 7 आयआयटी, 16 आयआयआयटी, 7 आयआयएम तसेच 15 एम्स आणि 390 विद्यापीठांची घोषणा उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणारी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणारी त्यांना संधी देणारी आहे.
उद्योगांना बळकट करणारा हा अर्थसंकल्प-खासदार नवनीत राणा म्हणाल्या, " हा अर्थसंकल्प देशातील नागरिकांना अंधारात ठेवणारा नाही तर वास्तवात उतरणार आहे. आदिवासी क्षेत्राच्या विकासासह ग्रामीण आणि शहरी भागासह भागात पंतप्रधान आवास योजनेसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनविणारा हा अर्थसंकल्प असून आशा वर्कर अंगणवाडी सेविका त्यांचे अंगणवाडी सेविकांनाही आर्थिकदृष्ट्या बळकट करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पामध्ये लघुउद्योगांना बळकटी मिळावी. या संदर्भात पुरेपूर विचार करण्यात आला. करामध्ये सवलत देऊन सर्वसामान्य नागरिकांसह उद्योगांना बळकट करणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाच्या पायाभूत सुविधा बळकट करण्याचा विचार या अर्थसंकल्पात आहे. शेतकऱ्यांचे भविष्यदेखील उज्वल असेल, याचा विचार या अर्थसंकल्पात केला" असल्याचंदेखील खासदार राणा यांनी म्हटलं आहे.
अर्थसंकल्प अंतरिम नसून अंतिम-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, "देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा आणि नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला मारणारा, करदात्यांचे पाकीट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प गुरुवारी केंद्र सरकारनं सादर केला. केंद्र सरकारने विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प भारतीयांच्या माथी मारला आहे. पुन्हा एकदा विकसित भारताचं दिवास्वप्न दाखविण्याचे काम केंद्र सरकारनं केलं आहे. हा अर्थसंकल्प अंतरिम नसून अंतिम असल्याची" खोचक टीकाही विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.
केंद्र सरकार महिलांच्या सक्षमीकरणाची भाषा करते. मात्र महिलांवरील होणाऱ्या अत्याचार रोखण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पीक विम्याचा माध्यमातून केवळ चार कोटी शेतकऱ्यांना फायदा झालाय-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार