मुंबई- कर्जाचा मासिक हप्ता भरण्याकरिता आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं (आरबीआय) रेपो दरात कपात केली आहे. रेपो दरात कपात केल्यानं कर्जाच्या व्याजदरांवर थेट परिणाम होतो. त्यामुळे गृहकर्जापासून कार कर्जाचा मासिक कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता आहे.
गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच आरबीआयनं रेपो दर कमी केला आहे. यापूर्वी मे २०२० मध्ये रेपो दर ४ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला होता. तिमाही पतधोरण निश्चित करण्यासाठी ५ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक झाली. या बैठकीत घेण्यात आलेला निर्णय पतधोरण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केला.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले, "पतधोरण समितीनं (एमपीसी) एकमतानं रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सनं (बीपीएस) कमी केला. रेपो दर हा ६.५ टक्क्यांवरून ६.२५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे."
आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- पाच वर्षांत प्रथमच आरबीआयकडून व्याजदरात २५ बेसिस पॉइंटनं कमी करून ६.२५ टक्के केले.
- आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देशाचे आर्थिक वर्ष २६ च्या विकासाचे लक्ष्य ६.६ टक्क्यांवरून ६.७ टक्के होईल, असा अंदाज व्यक्त केला.
- अन्नपदार्थांवरील अनुकूल परिस्थितीमुळे महागाई कमी झाली आहे. ही महागाई हळूहळू कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
- ग्रामीण भागातील मागणी वाढतच आहे. तर शहरी भागातील मागणी मंदावली आहे.
- संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील आरबीआय पतधोरण समितीनं आर्थिक वर्ष २६ मध्ये महागाई ४.२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा जीडीपीवरील अंदाज
- पहिल्या तिमाहीत सुमारे ६.७%
- दुसऱ्या तिमाहीसाठी ६.७%
- तिसऱ्या तिमाहीसाठी ७%
- चौथ्या तिमाहीसाठी ६.५%
हेही वाचा-
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बॉम्बनं उडवण्याची धमकी; रशियन भाषेत आला ई-मेल, तपास सुरू
- RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भावनिक पोस्ट करीत सहकाऱ्यांचे मानले आभार, म्हणाले...