नवी दिल्लीGDP growth : चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारताचा GDP 8.4 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळं भारत सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनली आहे. तिसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी वाढीचा दर 8.4% इतका आहे. अर्थव्यवस्थेचे हे आकडे पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त आहेत. देशातील उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळं जीडीपीचा वेग आणखी वाढला आहे. मागील तिमाहीत जीडीपी वाढ 7.6 टक्के होता. तो वाढून आता 8.4 टक्यांवर पोहोचला आहे.
सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था :भारत ही जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. जागतिक बँकेपासून ते IMF पर्यंत सर्वांनी कौतुक केलं आहे. आता तिसऱ्या तिमाहीतदेखील अर्थव्यवस्थेत कमालीची सुधारणा झालीय. सांख्यिकी अंमलबजावणी मंत्रालयानं 29 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर तिमाहीत भारताचं सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वेगानं वाढल्याचा दावा केला आहे.
विकास दर 7.6 टक्के राहण्याचा अंदाज :भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढता वेग पाहता, NSO नं आपल्या दुसऱ्या अंदाजात 2023-24 या आर्थिक वर्षासाठी देशाचा विकास दर 7.6 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी, जानेवारी 2024 मध्ये जाहीर केलेल्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, चालू आर्थिक वर्षासाठी GDP वाढीचा दर 7.3 टक्के राहणार असल्याचं म्हटलं होतं.
अर्थव्यवस्थेत 8.7 टक्यानं वाढ : भारताची अर्थव्यवस्थेत 2022-23 मध्ये 7.2 टक्के, 2021-22 मध्ये 8.7 टक्यानं वाढ झाली होती. देशांतर्गत मागणी, खासगी गुंतवणूक देशात झाल्यामुळं GDP मध्ये वाढ झाली आहे. तसंच 10 वर्षात सरकारनं केलेल्या सुधारणा, उपाययोजनांमधून अर्थव्यावस्था गतीमान झाली, असं वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागानं यापूर्वी सांगितलं होतं.
2030 पर्यंत भारत 7 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था :पुढील तीन वर्षांत, भारत 5 ट्रिलियन डॉलर्सच्या GDPसह जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे. पुढील सहा ते सात वर्षांत (2030 पर्यंत) भारत 7 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची आकांक्षा बाळगू शकतो, असं अर्थ मंत्रालयानं म्हटलंय. GDP वाढीचा अंदाज, चलनवाढ, राजकीय स्थैर्य, आर्थिक धोरण या सर्वामुळं भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ होणार आहे. SBI च्या आर्थिक संशोधन विभागानं आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत GDP वाढीचा अंदाज मांडणारं विश्लेषण केलं होतं. त्यावेळी संस्थेनं जीडीपी वाढीचा दर 6.8 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा अंदाज 7 टक्के राहणार असल्याचं म्हटलं होतं.
हे वाचलंत का :
- भारताचा जीडीपी विकासदर पुढील वर्षी 6.5 टक्क्यांनी का घसरेल? जाणून घ्या
- दुसऱ्या तिमाहीतील जीडीपी अंदाज : प्रमुख मुद्द्यांवर एक नजर
- India GDP : जीडीपी वाढण्याबाबत मूडीजचा अहवाल; जीडीपीत वाढ होण्याबाबत अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केलं 'हे' मत