मुंबई World TB Day : 24 मार्च हा दिवस जगभरात जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त मुंबईत क्षय रोगाची स्थिती काय आहे? क्षयरोग निर्मूलनासाठी देशभरात पावलं उचलली जात असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात पालिका काय उपायोजना राबवत आहे? रुग्णांची आकडेवारी काय आहे? या रोगाची लक्षणं काय आणि त्यावर उपाय काय? यावर प्रकाश टाकणारा ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट.
मागील काही वर्षांपासून क्षय रोगाचे निर्मूलन आणि हा रोग समूळ नष्ट करण्यासाठी संपूर्ण देशभरात प्रयत्न केले जात आहेत. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देखील क्षयरोग नियंत्रणासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याच उपक्रमामुळे मुंबईतील क्षयरोग रुग्णांमध्ये घट झाल्याचा दावा बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. क्षयरोग हा एक गंभीर आजार असून, कुपोषण आणि अस्वच्छता या विकाराच्या प्रसारास कारणीभूत ठरतात.
या संदर्भात पालिका प्रशासनानं म्हटलंय की, क्षयरोग निर्मूलनासाठी मागील काही वर्षांपासून पालिका सार्वजनिक सार्वजनिक आरोग्य विभाग काम करत आहे. या विभागामार्फत रुग्णांच्या तपासण्या, त्यांच्यावर अत्याधुनिक उपचार पद्धतीद्वारे करण्यात येणारे उपचार. आणि आमच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने केला जाणारा रुग्णांच्या प्रकृतीचा पाठपुरावा यामुळे मुंबईतील क्षयरोग बाधितांमध्ये मोठ्या प्रमाणात आता घट झाली आहे.
आकडे काय बोलतात? : या संदर्भात महानगरपालिकेनं आकडेवारी देखील दिलेली असून या आकडेवारीनुसार, औषध प्रतिरोध क्षयरोगाचा 2020 वर्षासाठी क्षयरोग बरा होण्याचा दर 72 टक्के इतका असून, वर्ष 2021 मध्ये हा दर 7 टक्के पर्यंत वाढला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत क्षयरोग नियंत्रणासाठी सातत्यानं हाती घेण्यात आलेल्या विशेष उपक्रमामुळं रूग्णसंख्येत घट शक्य झाली आहे. यासोबतच 2022 आणि 2023 या दोन वर्षांमध्ये सापडलेल्या रुग्णांमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात घट झाली. क्षयरोगातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये आणि क्षयरोग बाधित रुग्णांमध्ये सध्या मुंबईतील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, दुसरीकडे मुंबई बाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांच्या संख्येत मात्र वाढ झाल्याचं निदर्शनास आलंय.
उपचारासाठी पालिकेकडं काय आहे? : यासंदर्भात बोलताना पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शहा यांनी सांगितलं की, सद्यस्थितीत मुंबईत 42 सीबीनॅट मशीन, 10 ट्रूनॅट मशीन्स, 3 कल्चर आणि डीएसटी लॅब याद्वारे अत्याधुनिक चाचणी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच 25 सार्वजनिक क्षेत्रातील आणि 6 खाजगी केंद्रांवर औषध प्रतिरोधी उपचारांची सुविधा ही रूग्णांसाठी मोफत उपलब्ध आहे. सोबतच मुंबई महानगरपालिकेच्या क्षयरोग निर्मूलनाच्या मोहिमेत सहभागी झालेल्या निवडक खासगी हॉस्पिटल आणि निवडक खासगी डॉक्टरांकडे रुग्णांना क्षयरोगाचे मोफत निदान करता येणार आहे. मुंबईत क्षयरोग निर्मूलनासाठी पालिका प्रभावेपणे उपाययोजना राबवत आहे. पालिकेच्या सर्व 24 प्रभागांमध्ये अतिजोखीम गटातील रूग्णांचे बीसीजी लसीकरण आणि रूग्ण शोधण्यासाठी अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. मुंबईत क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रभावी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. यात रुग्णांच्या आहारावर देखील विशेष लक्ष दिलं जातं आहे.