जलपाईगुडी Bengal Thunderstorm : पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात रविवारी एका भीषण वादळाचा तडाखा बसला. त्यामुळं या परिसरात मोठी नासधूस झाली. जिल्ह्याच्या बहुतांश भागात गारपिटीसह सोसाट्याच्या वाऱ्यामुळं अनेक झोपड्या व घरांचं नुकसान झालं. झाडंही उन्मळून पडली. विजेचे खांब पडले. या वादळामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय. तर 170 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिली भेट : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानीवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करुन रविवारी रात्रीच जलपाईगुडीला भेट दिली. त्यांनी या परिसराचा आढावा घेतला. चक्रीवादळामुळं प्रभावित झालेल्या लोकांना भेटण्यासाठी जलपाईगुडी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटललाही भेट दिली.
वादळामुळं होणारा विध्वंस : रविवारी पश्चिम बंगालला धडकलेल्या चक्रीवादळानं मोठा विध्वंस केला. दुपारी साडेतीनच्या सुमारास हे वादळ आलं. हे वादळ सुमारे 10 मिनिटं चाललं. यात अनेक झाडं उन्मळून पडली. नागरिकांच्या घरांचंही नुकसान झालं. यापूर्वी जलपाईगुडीच्या जिल्हा दंडाधिकारी शमा परवीन यांनी आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. तर आता वादळामुळं आणखी एका महिलेचाही मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलंय.