हैदराबाद- जगभरात प्रसिद्ध असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे. मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला. तर 40 भाविक जखमी झाले आहेत.
बुधवारी सकाळपासूनच तिरुपतीच्या विविध तिकीट केंद्रांवर हजारो भाविक वैकुंठ द्वार दर्शनाचे टोकन घेण्याकरिता रांगेत उभे होते. टोकन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविकाची गर्दी झाल्यानंतर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर पोलिसांनी भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. अपघातानंतर तिरुपती पोलिसांनी तातडीनं परिस्थिती नियंत्रणात आणली.
तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी (Source- ETV Bharat Reporter) कशामुळे घडली दुर्घटना?- तिरुपती देवस्थानाकडून वैकुंठ द्वाराचं दर्शन दहा दिवसांसाठी खुलं करण्यात येणार आहे. त्यासाठीया महिन्याच्या 10, 11 आणि 12 तारखेला वैकुंठ द्वार सर्व दर्शन टोकन जारी केले जाणार आहेत. गुरुवारी पहाटे 5 वाजल्यापासून टोकन दिले जाणार असल्याची तिरुपती देवस्थान ट्रस्टनं घोषणा केली होती. त्यामुळे हजारो भाविकांनी टोकन घेण्याकरिता गर्दी केली होती. भाविकांना वैरागी पट्टीडा पार्क येथील रांगेत थांबण्याचं आवाहन केल्यानंतर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदी, चंद्राबाबू आणि राहुल गांधींनी व्यक्त केला शोक
- दुर्घटनेवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयाकडून दु:ख व्यक्त करण्यात आलं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स मीडियावर म्हटलं, "तिरुपतीमधील दुःखद चेंगराचेंगरीची घटना अत्यंत दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या संवेदना आहेत. या कठीण परिस्थितीत काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर शक्य ती मदत करावी".
मुख्यमंत्री नायडू आज तिरुपती मंदिरात देणार भेट-टीटीडीचे अध्यक्ष बी. आर. नायडू यांनी तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर रामनारायण रुईया सरकारी रुग्णालयाला भेट देत जखमींची विचारपूस केली. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, "एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी काही भाविक तामिळनाडूचे आहेत. तर काही भाविक आंध्र प्रदेशचे आहेत. केवळ एका मृतदेहाची ओळख पटलेली आहे". मंदिर समितीचे अध्यक्ष बी. आर. नायडू यांनी दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. टीटीडी बोर्डाचे सदस्य भानु प्रकाश रेड्डी यांनी दुर्घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली. ट्रस्ट या संदर्भात चौकशी करून योग्य कारवाई करेल, अशी त्यांनी ग्वाही दिली. आंधप्रदेशचे मुख्यमंत्री नायडू आज सकाळी तिरुपती मंदिराला भेट देऊन दुर्घटनेचा आढावा घेणार आहेत.
हेही वाचा-तिरुपती : तिकीट काउंटरवर चेंगराचेंगरी, किमान चार जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची भीती