नवी दिल्ली : दिवाळीच्या सणादरम्यान झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळं दिल्लीतील हवेची गुणवत्ता अधिकच खालावली आहे. दिल्लीतील जवळपास सर्वच क्षेत्रांचा वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) 500 च्या वर पोहोचलाय. त्यामुळं दिल्लीकरांच्या डोक्यावर सध्या वेगवेगळ्या आजारांची टांगती तलवार आहे. दरम्यान, या प्रदूषित हवेत कोणते हानिकारक घटक असतात? आणि ते शरीराच्या सर्व भागांवर कसे परिणाम करतात? या संदर्भात 'ईटीव्ही भारत'नं राजेंद्र प्लेस येथील बीएलके हॉस्पिटलचे चेस्ट अॅंड रेस्पिरेटरी डिजीज विभागाचे एचओडी डॉ. संदीप नायर यांच्याशी चर्चा करून सविस्तर माहिती घेतली आहे.
हवेत प्राणघातक घटक : डॉ. संदीप नायर म्हणाले, "दिल्लीत सध्या श्वास घेणंही कठीण होत आहे. सध्या हवेत असे हानिकारक घटक आहेत. ज्यामुळं लोकांना अनेक गंभीर आजार होत आहेत. सर्वप्रथम, हवेत कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड यांसारखे अनेक प्राणघातक ऑक्साईड असतात. जसजसे प्रदूषण वाढते तसतसे हवेतील त्यांचे प्रमाण वाढते. पेट्रोल आणि डिझेलच्या धुरामुळं त्यांचं प्रमाण अधिक वाढत जातं. त्यामुळं लोकांना श्वास घेण्यास त्रास होणं, डोळ्यात जळजळ होणं, डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू लागतात. तसंच वाढत्या प्रदूषणामुळं कर्करोगासारखे अत्यंत घातक आजारही उद्भवू शकतात."
पुढं ते म्हणाले, "सध्या हवेतील हानिकारक घटक शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी घातक ठरत आहेत. त्यामुळं लोकांना श्वास घेण्यास त्रास, दम्याचा त्रास आणि लेन्सशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतंय. इतकंच नाही तर या हवेत असे काही घटक असतात, ज्यामुळं मानवी हाडे कमकुवत होतात. तसंच हे विषारी घटक जेव्हा रक्तात मिसळतात तेव्हा ब्लड कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात."