नवी मुंबई : नवी मुंबई परिसरातील कामोठे येथील सेक्टर 6 मधील ड्रीम्ज आपार्टमेंटमध्ये माय-लेकाचा मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. गीता भूषण जग्गी (70) त्यांचा मुलगा जितेंद्र भूषण जग्गी ( 45) अशी मृतदेह आढळून आलेल्या दोघांची नावं आहेत. या दोघांचीही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरामुळे कामोठ्यात मोठी दहशत पसरली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण : नवी मुंबईतील कामोठे परिसरातील सेक्टर 6 येथील सरोवर हॉटेलच्या बाजुला ड्रीम हौसिंग सोसायटी आहे. या सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक 104 चा दरवाजा आतून बंद असून घरातील व्यक्ती काहीही प्रतिसाद देत नाहीत, अशी माहिती सव्वा चार वाजता कामोठे पोलीस ठाणे येथे मिळाली. माहिती मिळाल्यानं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या फ्लॅटचा दरवाजा बाहेरून उघडून घराची पाहणी केली असता गीता भूषण जग्गी (70) त्यांचा मुलगा जितेंद्र भूषण जग्गी ( 45) हे दोघं मायलेक मृत अवस्थेत आढळून आले. घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. पुढील तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत. मृत जितेंद्र हा विवाहित असून गेली 15 वर्ष पत्नीपासून विभक्त राहत आहे. जितेंद्रची पत्नी त्याच्या जवळपास राहत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.
हत्या की आत्महत्या? : कामोठ्यात ड्रीम्ज अपार्टमेंटमध्ये एका घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. मृत गीता यांचा मुलगा जितेंद्र याच्या अंगावर मारल्याचे व्रण असल्यानं हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी जेव्हा दरवाजा उघडून जग्गी कुटुंबीयांच्या घरात प्रवेश केला, तेव्हा घरातील गॅस सिलेंडर लिक असल्याचं आढळलं. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून हत्या की आत्महत्या याचा तपास सुरु करण्यात आला आहे. सोसायटीचे सीसीटीव्ही चेक करण्यात येत आहेत.
हेही वाचा :