मुंबई- बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्य सरकारनं आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. बसवराज तेली हे सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख आहेत. एसआयटीमधील सर्व अधिकारी बीड जिल्ह्यातील आहेत. सध्याचे तपास अधिकारी डीएसपी अनिल गुजर हेही तपास पथकात सामील होणार आहेत.
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्यानंतर राज्यभरात संतापाचं वातावरण आहे. पवनचक्की कंपनीकडे गुंडांनी खंडणीची मागणी केल्यानंतर सरपंच देशमुख यांनी विरोध केल्यानं त्यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सरपंच संतोष हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली नव्हती. मस्साजोग ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी जलसमाधी आंदोलन करत फरार आरोपींना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांसह प्रशासनाची पळापळ झाली. सरपंच हत्याप्रकरणाचं दिवसेंदिवस गांभीर्य वाढत असल्याचं पाहून अखेर राज्य सरकारनं एसआयटी नेमण्याचं आदेश दिले आहेत.
एसआयटीमध्ये बीडचे कोणते अधिकारी आहेत?एसआयटीमध्ये बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह शिवलाल जोनवाल आणि उपनिरीक्षक महेश विघ्ने, केजचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शंकर शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलीस हवालदार मनोज राजेंद्र वाघ, पोलीस नेते चंद्रकांत एस. काळकुंटे, पोलीस नायक बाळासाहेब देविदास आखाबरे, पोलीस हवालदार संतोष भगवानराव गित्ते यांचा समावेश आहे.
सीआयडीकडून तपास सुरू- संतोष देशमुख खून प्रकरणाचा सध्या सीआयडीकडून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणात सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दीडशेहून अधिक जणांची चौकशी केली. सीआयडीनं आणखी तीन जणांना चौकशीसाठी बोलावलं आहे. वाल्मिक कराडनं दोन कोटींची कथिपणं मागितलेली खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख हत्येसंदर्भात सीआयडीकडून तपास सुरू आहे. सीआयडीची टीम सर्व कॉल रेकॉर्ड आणि सीडीआर तपासत आहे. पोलिसांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांना अटक केली आहे. सरपंच हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तीन आरोपी फरार आहेत. त्यांचा बीड पोलिसांसह सीआयडीकडून शोध घेण्यात येत आहे.
वाल्मिक कराडच मास्टरमाईंड?वाल्मिक कराडच हा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा आरोप विरोधकांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केला होता. मात्र, कराड हा फरार असल्यानं पोलिसांह महायुती सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका सुरुच ठेवली. त्यानंतर बीडमधील राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मंगळवारी पुण्यातील सीआयडीसमोर शरण आला. त्याला बीड जिल्ह्यातील केज न्यायालयानं 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कराडला लागणारी औषधे पुरविण्यात आल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
हेही वाचा-