नवी दिल्ली- शिवसेनेचे खासदार (यूबीटी) संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीवर निशाणा साधला. ते म्हणाले, " कोणतीही शहानिशा न करता महिलांना 1500 रुपये देण्यात आले. महिलांची मते विकत घेण्यात आली आहेत. एका घरात ३ महिलांना पैसे देण्यात आले. आता सरकारचे डोळे उघडले आहेत. सरकार नियम बदलणार आहे. पैसे देताना नियम आणि निकष आठवले नाहीत का?"
शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत म्हणाले, " निवडणुकीच्या आधी कोणतीही शहानिशा न करता 1500 रुपयांचा व्यवहार केला. त्याबाबत आक्षेप घेण्यात आला. नवीन मुख्यमंत्र्यांनीदेखील निकष बदलणार असल्याचे सांगितले. निवडणुकीपूर्वी महिलांना ती लाच होती. त्यांना फक्त मते घ्यायची होती. जास्त उत्पन्न असलेल्या लाडकी बहिणींना पैसे जातात, हे नव्या मुख्यमंत्र्यांच्या ध्यानात आल्याचं माझ्या वाचनात आले. लाडकी बहीण योजना ही गरीब महिलांसाठी योजना आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही लाख महिला लाभ घेत असल्याचं सरकारच्या लक्षात आलेलं आहे. आता तिजोरीवर भार पडत असताना त्यांचे डोळे उघडले आहेत. पण, ज्या महिलांना पैसे दिले ते पैसे परत घेऊ नका. त्यांना नोटीस पाठवू नका. जे घडतेय, त्यांच्यावर आमचे लक्ष आहे".