फरीदकोट : पंजाबच्या फरीदकोटमधील कोटकापुरा रोडवर भीषण अपघात झालाय. या अपघातात भरधाव वेगानं जाणारी बस एका ट्रकला धडकली (bus falls into drain after colliding with truck), त्यानंतर बस नाल्यात पडली. अपघाताच्या वेळी बस प्रवाशांनी भरलेली होती. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी फरीदकोट येथील गुरु गोविंद सिंग वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर या अपघातात 26 जणांचे प्राण वाचल्याचं सांगितलं जातंय.
बसचा वेग जास्त असल्यानं झाला अपघात : बस अपघातादरम्यान सुरक्षित बाहेर पडलेल्या प्रवाशांपैकी एका व्यक्तीनं सांगितलं की, "बसचा वेग खूप जास्त होता. भरधाव वेगातील बस ट्रकला धडकली. धडकेनंतर बस नाल्यात पडली, त्यानंतर काय झाले याबद्दल काहीही कळलं नाही. लोकांनी मला सुरक्षित बाहेर काढलं."
अधिकारी घटनास्थळी पोहोचले : घटनेची माहिती मिळताच एसएसपी प्रज्ञा जैन घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी सांगितलं की, "बसमधून २६ प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं असून ते सर्वजण सुरक्षित आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ५ जणांचा मृत्यू झालाय. तर अपघात कशामुळं झाला हे सांगणं आताच घाईचं ठरेल. सध्या आमचं लक्ष मदत कार्यावर आहे." तसंच घटनास्थळी असलेल्या पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाईल. हरवलेल्यापैकी एक मुलगा सापडला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
- आमदारांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली : यावेळी फरीदकोटचे आमदार गुरदित सिंग सेखोन हेही जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. जखमींना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी म्हणून संपूर्ण प्रकरण मुख्यमंत्र्यांकडं पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -