Uttarkashi Sahastra Tal Trek Accident :सहस्त्रतालच्या ट्रेकसाठी गेलेल्या बावीस सदस्यीय ट्रेकिंग ग्रुपमधील 8 जणांचा खराब हवामानामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. उर्वरित 14 ट्रेकिंग मेंबर्स अडकल्याची माहिती समोर आली होती. या घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच त्यांनी बुधवारी सकाळी एक पथक रवाना करून अडकलेल्या ट्रेकर्सला वाचवलं.
हवाई दलाकडुन बचाव कार्य सुरू : अडकलेल्या ट्रेकर्स आणि मृतदेहांची सुटका करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हवाई दलाच्या माध्यमातून हेली रेस्क्यू ऑपरेशन राबविण्याची विनंती केली होती. बेपत्ता ट्रेकर्सच्या शोधासाठी हवाई दलानं आजपासून बचावकार्य सुरू केलं. जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून हवाई दलाची दोन चेतक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत. यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन सचिव रणजित सिन्हा यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या घटनेची माहिती दिलीय.
आठ जणांचा मृत्यू :समोर आलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील 18 सदस्य आणि महाराष्ट्रातील 1 आणि 3 स्थानिक ट्रेकर्सचा समावेश आहे. हे सर्व सहस्त्रताल या ठिकाणी ट्रेकसाठी निघाले होते. सर्व ट्रेकर्स 7 जूनपर्यंत परत येणार होते. ट्रेकिंग दरम्यान अचानक खराब हवामानामुळं, दाट धुकं आणि बर्फवृष्टीमध्ये टीम अडकली. तेथे योग्य व्यवस्था नसल्यानं ट्रॅकर्संना संपूर्ण रात्र थंडीत काढावी लागली. थंडीमुळे 8 ट्रेकर्सचा मृत्यू झाला. टीमला ट्रॅकवर घेऊन जाणाऱ्या ट्रॅकिंग एजन्सीच्या मालकानं त्याच्या संस्थेच्या अधिकाऱ्याला ट्रॅकर्सच्या मृत्यूची माहिती दिलीय.