अजमेर (राजस्थान)Sabarmati Express Accident:राजस्थानातील अजमेरच्या मदार स्थानकाजवळ मोठा रेल्वे अपघात झालाय. या रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला मागून येणाऱ्या रेल्वेनं धडक दिल्यानं मालगाडी रुळावरुन घसरली. मदार स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसनं उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली. त्यामुळं साबरमती एक्स्प्रेसचे इंजिन आणि 4 डबे रुळावरुन घसरले. सध्या तरी या अपघातात एकही प्रवासी जखमी न झाल्याची माहिती समोर आली नाही. तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झालीय. घटनास्थळी मदतकार्य सुरू झालंय. रेल्वेनं अजमेर रेल्वे स्थानकावर मदतीसाठी हेल्प डेस्क उभारलाय.
अपघातस्थळी मदतकार्य सुरू : रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शशी किरण यांनी सांगितलं की, "ट्रेन क्रमांक 12548 साबरमती-आग्रा कँट रेल्वे रुळावरुन घसरलीय. हा अपघात मध्यरात्री 1.04 वाजता झाला." या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागात खळबळ उडाली. अपघातवेळी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रेल्वेचे अधिकारी तसंच अपघातग्रस्त मदत वाहनही घटनास्थळी पोहोचलं आहे. सध्या रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचं काम सुरू झालंय. तर अपघातग्रस्त रेल्वेचा मागचा भाग अजमेर रेल्वे स्थानकाच्या दिशेनं नेला जातोय.
- वाहतूक पुर्ववत होण्यास लागणार आठ तास : या अपघातामुळं रेल्वे रुळ पुन्हा सुरू होण्यासाठी 8 तास लागणार असल्याचं सांगण्यात येतंय. या अपघातामुळं या मार्गावरील पाच गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर रेल्वेत बसलेल्या प्रवाशांना दुसऱ्या रेल्वेनं अजमेर रेल्वे स्थानकावर नेण्यात आलं.