हल्द्वानी (उत्तराखंड) Haldwani Violence : उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यातील हल्द्वानीमध्ये गुरुवारी (8 फेब्रुवारी) मोठी दंगल उसळली. त्यामुळे सध्या शहरातील वातावरण तणावपूर्ण आहे. शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून, दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हल्द्वानी शहरातील वर्ग 1 ते 12 पर्यंतच्या सर्व शाळा आज 9 फेब्रुवारीला बंद राहतील. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जणांना गोळ्या लागल्याचं वृत्त आहे. त्यापैकी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण : गुरुवारी प्रशासन आणि हल्द्वानी महानगरपालिकेच्या संयुक्त पथकानं सरकारी जमिनीवर बांधलेलं प्रार्थनास्थळ बुलडोझरच्या सहाय्यानं जमीनदोस्त केलं. प्रशासनाच्या या कारवाईला स्थानिकांनी विरोध करत पोलिसांवर दगडफेक सुरू केली. काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र प्रकरण शांत होण्याऐवजी आणखी भडकलं. त्यानंतर काही दंगलखोरांनी पोलिसांच्या वाहनांनाही आग लावल्यानं वातावरण अधिकच तंग झालं. दंगलखोरांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस आणि पत्रकार जखमी झाले आहेत. दंगलखोरांनी बनभूलपुरा पोलीस स्टेशनलाही आग लावल्याचं वृत्त आहे. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश :प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी देहराडूनमध्ये तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली. बैठकीनंतर धामी म्हणाले की, "न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाचं पथक हल्द्वानी येथे अतिक्रमणविरोधी मोहिमेसाठी गेलं होतं. त्यावेळी काही समाजकंटकांचा पोलिसांशी वाद झाला. यावेळी काही लोकांनी पोलिसांवर दगडफेकही केली. केंद्रीय दलाच्या अतिरिक्त फौजा हल्द्वानीला पाठवण्यात आल्या आहेत." मुख्यमंत्र्यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तसेच जाळपोळ करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही दिला आहे.