विजयवाडा commometation meeting of Ramoji Rao : रामोजी समुहाचे संस्थापक रामोजी राव यांना आज आंध्रप्रदेश सरकारतर्फे आदरांजली वाहण्यासाठी विशेष स्मृतीसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी रामोजी राव यांना भारत रत्न देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. तसंच रामोजी राव यांच्या नावाने विविध उपक्रमांची घोषणा यावेळी चंद्रबाबू नायडू यांनी केली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू म्हणाले की, रामोजी राव यांनी स्थापन केलेल्या संस्था त्यांच्या फक्त कुटुंबासाठी नव्हत्या, तर त्यांनी किमान १० कोटी लोकांना आपल्या संस्थांच्या माध्यमातून जगण्याचं बळ दिलं. त्यांना भारतरत्न देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यावेळी मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी रामोजी राव यांच्या स्मरणार्थ विविध उपक्रमांच्या घोषणाही केल्या. अमरावतीमध्ये रामोजी विज्ञान केंद्र उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अमरावतीतील एका रस्त्याला रामोजी राव यांचं नाव देण्याची घोषणाही त्यांनी केली. विशाखापट्टणममध्ये फिल्म सिटीला रामोजी राव यांचं नाव देणार असल्याचंही ते म्हणाले.
ईनाडूच्या माध्यमातून रामोजी राव यांनी निष्पक्ष पत्रकारिता केली. ईनाडूमध्ये सर्व पक्षांच्या नेत्यांना प्राधान्य देण्यात आलं. त्यांनी विश्वासार्ह पत्रकारितेची तत्व अगदी सचोटीनं जपली. काम करता-करता मृत्यूची त्यांची इच्छाही पूर्ण झाली. पत्रकार, कलाकार, अभिनेते याचबरोबर त्यांनी समाजासाठी आपलं संपूर्ण जीवन वाहिलं, त्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे अशी भावना यावेळी चंद्राबाबू यांनी व्यक्त केली. हैदराबादच्या विकासात रामोजीरावांची भूमिका महत्त्वाची आहे. आंध्रप्रदेशच्या राजधानीचे नाव अमरावती ठेवावे, अशी सूचना त्यांनीच केली होती. दुर्गम खेड्यात जन्म घेऊन चिकाटीने रामोजी राव शिखरावर पोहोचले. रामोजी राव ही व्यक्ती नसून व्यवस्था आहे. त्यांनी निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात ते नंबर 'वन' होते. सचोटी आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक रामोजी राव होते. त्यांनी जे काही केलं त्यात त्यांना नेहमीच जनहित पाहिलं. प्रसारमाध्यम क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना आता भारत रत्न देण्याची आपली जबाबदारी आहे.
यावेळी बोलताना रामोजी राव यांचे चिरंजीव किरण राव यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "माझ्या वडिलांनी नवंध्राच्या राजधानीसाठी अमरावती हे नाव सुचवलं. अमरावती हे देशातील सर्वात मोठं शहर झालं पाहिजे. त्यामुळे अमरावतीच्या विकासाकरता 10 कोटी रुपयांची देणगी देत असल्याचं किरण राव यांनी जाहीर केलं. यावेळी या देणगीचा धनादेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सुपूर्द करण्यात आला. वडिलांच्या स्मृती सभेला उपस्थित असलेल्या सर्वांना विनम्र अभिवादन करत असल्याचं ते म्हणाले. या आयोजनासाठी त्यांनी आंध्रप्रदेश सरकारचे आभार मानले. रामोजी राव यांनी लोकशाही मूल्ये जपण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. कितीही अडचणी आल्या तरी ते जनतेच्या पाठीशी उभे राहिले. कुठेही आपत्ती आली तर ते मदतीसाठी सदैव तत्पर असायचे. वडिलांच्या भावनेने लोकांच्या कल्याणासाठी आम्ही स्वतःला झोकून देऊ, असं यावेळी किरण राव यांनी सांगितलं.