मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील गटनेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. "वाल्मिक कराड शरण आल्यानं महाराष्ट्राच्या पोलिसांची यामध्ये लाज गेली आहे. पोलीस आम्हाला पकडू शकणार नाही, हे त्यानं दाखवून दिलं आहे. वाल्मिक कराड आत आला असला, तरी त्याचा आका मात्र अजून बाहेरच आहे," अशी टीका त्यांनी केली.
मंत्र्यांचे निकटवर्तीय आरोपी : मंत्र्यांचे निकटवर्तीय आरोपी असताना चौकशी कशी होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. "आमच्या मनात संशय आहे की त्यांनीच सर्व मॅनेज केलेय," असं ते म्हणाले. वाल्मिक कराड आज शरण येणार हे संपूर्ण बीडला माहिती होते. शरण येताना सोबत कार्यकर्ते घेऊन कराड आला, हा पोलिसांना धक्का आहे. पोलिसांची भीती गुन्हेगारांना वाटायलाच हवी, मात्र आजचं प्रकरण म्हणजे गुन्हेगारांचं उदात्तीकरण असल्याची टीका त्यांनी केली. पोलिसांना वाकुल्या दाखवण्याचा हा प्रकार आहे. अशा प्रकरणांमुळे सरकारची अब्रू जात असल्याची टीका त्यांनी केली.
धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवणे गुन्ह्यावर चादर घालणे : वाल्मिक कराड आत असला तरी त्याचा आका मात्र अजूनही बाहेरच आहे. पोलिसांची दहशत भीती कमी झाल्यानं असे प्रकार वाढीस लागल्याचं आव्हाड म्हणाले. हे पोलिसांसाठी आव्हान आहे. अशा प्रकरणांमुळे राज्यव्यवस्था उद्धवस्त होण्याची भीती आहे. जेव्हा आरोप होतो त्यामध्ये मंत्र्यांचं नाव आलं तर तपास होईपर्यंत मंत्री खुर्ची सोडून बाहेर बसतो, असा आजपर्यंतचा इतिहास आहे, याची आठवण आव्हाडांनी करुन दिली. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवणं म्हणजे या गुन्ह्यावर चादर घालणं आहे, असं आव्हाड म्हणाले.
मुंडे मंत्री असेपर्यंत चौकशी योग्य प्रकारे पुढे जाणार नाही : डीपीडीसीमधून कुणाला किती निधी द्यायाचा, कुणाला कामं द्यायची याचा निर्णय वाल्मिक कराड करायचा, मग पालकमंत्री काय करायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्याचा निर्णय अजित पवारांनी घेण्याची गरज आहे. युती सरकारमध्ये मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्याला काढण्याचे निर्देश देत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. धनंजय मुंडे मंत्री असेपर्यंत चौकशी योग्य प्रकारे पुढे जाणार नाही, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत, ते कोणत्याही गुन्हेगाराला माफ करतील, असं वाटत नाही, असं आव्हाड म्हणाले.
हेही वाचा :