अयोध्या Ram Mandir Pran Pratishta : रामनगरी अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याचं सर्वच क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलंय. आज होणाऱ्या सोहळ्यासाठी राजकीय, धार्मिक, खेळाडू, बॉलिवूड, उद्योग आदी क्षेत्रातील अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलंय. यापैकी काहीजण रविवारीच अयोध्येत दाखल झाले. तर काहीजण आज दाखल होत आहेत.
दिग्गज सेलिब्रिटी राहणार उपस्थित :आज अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मुंबईहून रवाना झाले. यात महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, कैटरीना कैफ, अभिनेता विक्की कौशल, अभिनेता रणबीर कपूर त्याची पत्नी आलिया भट्ट, जैकी श्रॉफ, आयुष्मान खुराना, दिग्दर्शक रोहित शेट्टी, राजकुमार हिरानी हे मुंबईहून तर दक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी, राम चरण हे हैदराबाद विमानतळावरुन अयोध्येत जाण्यासाठी रवाना झाले आहेत. तर सुपरस्टार रजनीकांत, अनुपम खेर यांच्यासह काही दिग्गज सेलिब्रिटी कालच अयोध्येत दाखल झाले आहेत.
क्रिडाजगतातील दिग्गजांची उपस्थिती : आज अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी क्रिकेटसह क्रीडा जगतातील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलंय. यात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यासह क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, रवींद्र जडेजा, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, अनिल कुंबळे, रेहित शर्मा, फुलराणी सायना नेहवालसह अनेकांना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय. यापैकी माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे हा कालच अयोध्येत दाखल झालाय. तर विराट कोहली, रविंद्र जडेजाही अयोध्येत दाखल झाला आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर आज सकाळी मुंबईहून अयोध्येसाठी रवाना झालाय.
- राजकीय नेत्यांचीही मांदियाळी :रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक जण उपस्थित राहणार आहेत.
हे नेते राहणार अनुपस्थित : राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण विरोधी पक्षांतील नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलंय. मात्र अनेक जण अनुपस्थित राहणार आहेत. यात कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक जण अनुपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा :
- राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी 'हे' सेलिब्रिटी झाले रवाना
- राम मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मुर्तीची स्थापना; पाहा फोटो