नवी दिल्ली Rahul Gandhi Criticized PM Modi : राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये लडाखचा समावेश करण्याच्या प्रमुख मागणीसह सोशल ॲक्टिविस्ट सोनम वांगचुक आणि इतर स्वयंसेवकांनी लेह ते नवी दिल्ली अशी पदयात्रा सुरू केलीय. मात्र, सिंधू सीमेवरच पोलिसांनी वांगचुक आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलय. यावरुन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय.
काय म्हणाले राहुल गांधी? : राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलंय, "पर्यावरण आणि संवैधानिक हक्कांसाठी शांततेनं मोर्चा काढणाऱ्या सोनम वांगचुक आणि शेकडो लडाखमधील लोकांना ताब्यात घेणं योग्य नाही. लडाखच्या भवितव्यासाठी उभ्या असलेल्या ज्येष्ठांना दिल्ली सीमेवर का अडवलं जातंय? शेतकऱ्यांप्रमाणेच पंतप्रधान मोदींचा हा 'चक्रव्यूह' आणि अहंकारही नक्कीच मोडीत निघेल. लडाखचा आवाज तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत ऐकावा लागेल."
सोनम वांगचुक पोलिसांच्या ताब्यात :वांगचुक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांच्या अटकेची माहिती शेअर केली. वांगचुक पोस्टमध्ये म्हणाले, "मला आणि माझ्या 150 सहकाऱ्यांना दिल्ली सीमेवर पोलीस दलानं ताब्यात घेतलंय. यामध्ये 80 वर्षांवरील अनेक वृद्ध स्त्री-पुरुष आणि माजी सैनिकांचा समावेश आहे. आमचं काय होईल हे आम्हाला माहीत नाही. पण आम्ही बापूंच्या समाधीकडं शांततापूर्ण मोर्चा काढत आहोत."
लेह ते नवी दिल्ली पदयात्रा : वांगचुक आणि इतर स्वयंसेवकांनी त्यांच्या मागण्यांबाबत केंद्राला लडाखच्या नेतृत्वाशी पुन्हा चर्चा सुरू करण्याचं आवाहन करण्यासाठी लेह ते नवी दिल्ली असा पायी मोर्चा काढलाय. त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक म्हणजे लडाखचा राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करणे आहे. ज्यामुळं स्थानिक लोकांना त्यांची जमीन आणि सांस्कृतिक अस्मितेचं संरक्षण करण्यासाठी कायदे करण्याचे अधिकार मिळतील.
हेही वाचा -
- 'आयटी उद्योगासमोर AI चं मोठं आव्हान', AI आणि भविष्यातील नोकऱ्यांबद्दल चिंता - राहुल गांधी - Rahul Gandhi On AI
- "माफी तोच मागतो, जो चुकीचं काम करतो", राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र - Shivaji Maharaj Statue Collapse
- राहुल गांधी भारतीय की विदेशी नागरिक ? लखनौ उच्च न्यायालयाची केंद्र सरकारकडं विचारणा - Rahul Gandhi Citizenship