नवी दिल्ली President Droupadi Murmu Address : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केलं. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षातील कामगिरीचा उल्लेख केला. अभिभाषण सुरू करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी सर्व नवनिर्वाचित खासदारांचं अभिनंदन केलं. याशिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांबद्दल त्यांनी निवडणूक आयोगाचं कौतुकही केलं. जम्मू-काश्मीरबाबत त्या म्हणाल्या, यावेळी खोऱ्यात अनेक दशकांचा विक्रम मोडला गेला आहे. तिथं मोठ्या संख्येनं लोकांनी मतदान केलं. याशिवाय सरकारनं पारित केलेल्या पेपरफुटीविरोधी कायद्याचाही राष्ट्रपतींनी उल्लेख केला.
अर्थव्यवस्थेच्या तीनही स्तंभांना महत्त्व : "आपलं सरकार उत्पादन, सेवा तसंच कृषी या अर्थव्यवस्थेच्या तीनही स्तंभांना समान महत्त्व देत आहे. पीएलआय योजना, व्यवसाय करण्याची सुलभता यामुळं मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, रोजगाराच्या संधी वाढत आहेत. पारंपारिक क्षेत्राबरोबरच नविन क्षेत्राचाही प्रचार केला जात आहे. कार्यप्रदर्शन, परिवर्तन करण्याच्या संकल्पामुळं आज भारत जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे", असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
तिसऱ्यांदा सरकारवर विश्वास :"सहा दशकांनंतर देशात पूर्ण बहुमत असलेलं स्थिर सरकार स्थापन झालं. जनतेनं या सरकारवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे. त्यांच्या आकांक्षा हे सरकारच पूर्ण करू शकतं, हे लोकांना माहीत आहे. 18वी लोकसभा अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे. या लोकसभेची स्थापना अमृतकाळाच्या सुरुवातीच्या काळात झाली. सरकार या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. हा अर्थसंकल्प सरकारच्या दूरगामी धोरणांचा, भविष्यकालीन दृष्टीचा प्रभावी दस्तऐवज असेल. मोठ्या आर्थिक, सामाजिक निर्णयांसोबतच अनेक ऐतिहासिक पावलंही या अर्थसंकल्पात पाहायला मिळतील", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित : शेतकऱ्यांचा संदर्भ देत राष्ट्रपती म्हणाल्या, "20 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना वर्ग करण्यात आले. शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी आपण बनवू. सरकारनं शेतकऱ्यांच्या विकासावर विशेष भर दिला आहे. सरकारनं अशा अनेक योजना आणल्या आहेत, ज्या त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरत आहेत. कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारनं कृषी उत्पादनांसाठी एमएसपी (किमान आधारभूत किंमत) वाढवली आहे. जगभरात सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढत आहे. भारतीय शेतकरी ही मागणी पूर्ण करण्यास सक्षम आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे".
10 लाख लोक गरिबीतून बाहेर : "विकसित भारताची निर्मिती तेव्हाच शक्य आहे, जेव्हा देशातील गरीब, तरुण, महिला, शेतकरी सक्षम होतील. त्यामुळं माझं सरकार त्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे. त्यांना प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याचा आमचा उद्देश आहे. एकही व्यक्ती सरकारी योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी भारत इच्छाशक्तीनं काम करत आहे. सरकारनं 10 लाख गरीब लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढलंय. गेल्या दशकभरात सरकारच्या कार्यकाळात गरिबांची उन्नती झाली आहे. याशिवाय सरकारच्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणाचं नवं पर्व सुरू झालं. PM-Janman सारख्या 24 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या योजना आज अत्यंत मागासलेल्या आदिवासी गटांच्या उत्थानासाठी एक माध्यम बनत आहेत", असा उल्लेख त्यांनी केला.
येणारा काळ हरित युगाचा :येणारा काळ हरित युगाचा असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सांगितलं. "यासाठी सरकार आवश्यक ती पावलं उचलत आहे. आम्ही हरित उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढवत आहोत, ज्यामुळं नोकऱ्याही वाढल्या आहेत. सरकार दिव्यांग बांधव तसंच भगिनींसाठी स्वदेशी सहाय्यक उपकरणं बनवत आहे. वंचितांची सेवा करण्याचा हा संकल्प खरा सामाजिक न्याय आहे. सरकारच्या योजनांमध्ये देशातील गरीब, तरुण, महिला शक्ती, शेतकरी यांना महत्त्व दिलं जात आहे. त्यामुळं सरकारच्या योजनांमध्ये या चार स्तंभांना सर्वाधिक प्राधान्य दिलं जात आहे. त्यांना प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे", असं त्या म्हणाल्या.