नवी दिल्ली NDA Leaders Meeting : लोकसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या अनुषंगानं बुधवारी दुपारी 4 वाजता एनडीएची पहिली बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली. तासभर चाललेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीला 16 पक्षांचे 21 नेते उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएच्या खासदारांची 7 जूनला बैठक होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत ते राष्ट्रपतींकडं सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.
लोकसभा विसर्जित :राजनाथ सिंह, अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना सर्व मित्रपक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा विसर्जित केली.लोकसभा निवडणुकीत भाजपाला 240 जागा मिळाल्या आहेत. तसंच एनडीए घाडीनं 292 जागांसह बहुमताचा आकडा पार केलाय. चंद्राबाबूंचा टीडीपी 16 जागांसह आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. नितीश कुमारांचा जेडीयू 12 जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. बहुमतासाठी भाजपाला यावेळी दोन्ही पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. त्यांच्याशिवाय भाजपाला सरकार स्थापन करता येण्याची शक्यता दिसत नाही.