नवी दिल्ली :दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं, तर 'आप'चा दारूण पराभव झाला. हा पराभव दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मान्य केला. विजयानंतर नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा तसंच दिल्लीतील भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
दहा वर्षांनंतर दिल्ली मुक्त झाली :यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीकरांचे आभार मानले आहेत. "दिल्लीकरांनी आम्हाला खूप प्रेम दिलं. विकास करुन आम्ही याची परतफेड करणार आहोत. दिल्लीकरांचा विश्वास आणि प्रेम हे आमच्यावर कर्ज आहे. आम्ही देखील विकास करुन हे कर्ज चुकवू. हा सामान्य विजय नाही. दहा वर्षांनंतर दिल्ली मुक्त झाली आहे. डबल इंजिन सरकार दिल्लीचा डबल विकास करेल," असा विश्वास पंतप्रधान नरेंद् मोदी यांनी दिल्लीतील जनतेला दिला.
राजकारणात शॉर्टकट आणि खोटेपणाला जागा नाही : पंतप्रधान मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही विजयाच्या शुभेच्छा दिल्या. "दिल्लीचा मालक हा दिल्लीतील जनता आहे हे मतदारांनी दाखवून दिलं. राजकारणात शॉर्टकट आणि खोटेपणाला जागा नाही. जनतेनं शॉर्टकटवाल्या राजकारणाला घरी बसवलं. 2014, 2019, 2024 या तीनही लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीनं आम्हाला पाठिंबा दिला. दिल्ली हे एक शहर नसून, 'मिनी हिंदुस्तान' आहे. दिल्लीत सर्व राज्यातील लोकं राहतात. त्या सर्वांनी भाजपाला पाठिंबा दिला. दिल्लीत अशी एकही जागा नाही जिथं कमळ फुललं नाही," असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आप'वर तसंच अरविंद केजरीवाल यांच्यावर नाव न घेता टीका केली. 'सबका साथ, सबका विकास, दिल्लीचाही विकास' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी दिल्लीकरांना गॅरंटी दिली.