नवी दिल्ली PM Modi Slams Opposition : संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. हे एक तृतीयांश सरकार आहे, असं विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिणवलं. त्यावरुन आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. आता 10 वर्ष झाली आहेत, अद्याप 20 वर्ष बाकी आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सुनावलं. त्यांचा हा अंदाज पाहुन विरोधकही गर्भगळीत झाले. यावेळी त्यांनी "राष्ट्रपतींच्या भाषणात देशवासीयांसाठी प्रेरणा, प्रोत्साहन होतं. मागील अडीच दिवसात 70 खासदारांनी मतं मांडत योगदान दिलं, त्याबाबत सगळ्यांचे आभार मानतो," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नजरअंदाज केल्याचा आरोप करत विरोधकांनी वॉकआऊट केलं.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मानले आभार :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहाला संबोधित केलं. यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार व्यक्त केले. याबाबत बोलताना पंतप्रदान नरेंद्र मोदी म्हणाले, की "राष्ट्रपतींच्या अभिभाषणात देशवासीयांसाठी प्रेरणा, प्रोत्साहन होतं.एक प्रकारे सत्याच्या मार्गाचा पुरस्कारही झाला. या चर्चेत गेल्या अडीच दिवसात तब्बल 70 खासदारांनी आपली मतं मांडली. ही चर्चा अधिक समृद्ध करण्यासाठी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा अर्थ लावण्यात तुम्ही सर्व खासदारांनी दिलेल्या योगदानाबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो."
10 वर्ष झाली अजून 20 बाकी :"स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अनेक दशकानंतर देशातील जनतेनं एका सरकारला सलग तिसऱ्यांदा सेवेची संधी दिली आहे. 10 वर्षांनंतर सरकारचं सलग पुनरागमन झालं आहे. 6 दशकांनंतर भारतीय लोकशाहीतील ही एक असामान्य घटना आहे. काही लोकांनी मुद्दामहून तोंड फिरवलं, तर काही लोकांना समजलं नाही, ज्यांना समजलं त्यांनी मोठा गदारोळ केला. मला काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. निकाल आल्यापासून आमच्या सहकाऱ्यानं एकतृतीयांश सरकार आहे, असं वारंवार सांगितलं. 10 वर्षे उलटून गेली असून अजून 20 बाकी आहेत. यापेक्षा मोठं सत्य काय असू शकते. एक तृतीयांश झालं, अजून दोन तृतीयांश बाकी आहे, म्हणून त्यांच्या तोंडात तूप आणि साखर पडो."
संविधान दिनाला काँग्रेसचा विरोध :"बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे इथं येण्याची संधी मला मिळाली आहे. माझ्यासारखे अनेक लोक बाबासाहेब आंबेडकरांमुळे संसदेत आले आहेत. जनतेनं होकार दिला आणि तिसऱ्यांदाही येण्याची संधी मिळाली. 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करू, असं आमच्या सरकारच्या वतीनं लोकसभेत सांगण्यात आलं. मात्र जे आज संविधानाची प्रत घेऊन जगभर फिरत आहेत, त्यांनी 26 नोव्हेंबरला संविधान दिन घोषित करण्याला विरोध केला."
हेही वाचा :
- हिंदूंवर खोटे आरोप करण्याचं कारस्थान : पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर टीका - Parliament Session
- निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मांडलेल्या अर्थसंकल्पातून जनतेला काय मिळालं? शरद पवारांचा सवाल - Maharashtra Budget 2024
- संसदीय अधिवेशनातून आता मोदींना पळ काढता येणार नाही, कारण...संजय राऊतांचा एनडीएवर हल्लाबोल - SANJAY RAUT News