महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींची काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्तीवर बसून 'जंगल सफारी'; कॅमेरा घेत स्वतः काढले फोटो - PM Modi in Kaziranga National Park

PM Modi in Kaziranga National Park : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सफारी केलीय. यानंतर ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.

पंतप्रधान मोदींची काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्तीवर बसून 'जंगल सफारी'; कॅमेरा घेत स्वतः काढले फोटो
पंतप्रधान मोदींची काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्तीवर बसून 'जंगल सफारी'; कॅमेरा घेत स्वतः काढले फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 11:43 AM IST

गुवाहाटी PM Modi in Kaziranga National Park : पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना आज त्यांनी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्तीवर बसून फेरफटका मारला. तत्पूर्वी शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी काझीरंगा इथं रोड शो केला, जिथं मोठ्या संख्येनं स्थानिक लोकांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदींचं स्वागत करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं.

कॅमेरा घेत पंतप्रधानांची जंगल सफारी : पंतप्रधान मोदी पहाटे जीपमधून काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जाताना दिसले. यावेळी त्यांच्यासोबत वनविभागाचे अधिकारीही उपस्थित होते. राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका सोनाली घोष आणि वनविभागाच्या इतर अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना तिथं उपस्थित असलेल्या प्राण्यांची माहिती दिली. पंतप्रधान मोदी त्यांच्याबरोबर कॅमेरा घेऊन आले होते. त्यांनी सकाळी नॅशनल पार्कच्या अनेक सुंदर भागांची छायाचित्रे क्लिक केली. त्यांनी प्राण्यांचे फोटोही काढले. यासह त्यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या हत्तींना ऊस खाऊ घातला. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहेत.

काय आहे काझीरंगा उद्यानाची वैशिष्ट्ये : आसामचं मुकुटमणी मानलं जाणारं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे गेंड्यांचं सर्वात मोठं अधिवास, पक्ष्यांच्या 600 हून अधिक प्रजाती, डॉल्फिनची वाढणारी लोकसंख्या आणि वाघांची सर्वाधिक घनता असलेलं एक ठिकाण आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एक लोकप्रिय पर्यटन केंद्र म्हणून उदयास आलंय. हे देश आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतं. काझीरंगा इथं 2200 हून अधिक भारतीय एकशिंगे गेंडे राहतात. हे त्यांच्या एकूण जगाच्या लोकसंख्येच्या 2/3 आहे. मेरी कर्झन यांच्या शिफारसीनुसार 1908 मध्ये विकसित केलेलं हे उद्यान पूर्व हिमालयातील जैवविविधतेचं आकर्षण केंद्र आहे. हे गोलाघाट आणि नागाव जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेलं आहे. हे उद्यान 1985 मध्ये युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं होतं.

अनेक प्रकल्पांची करणार पायाभरणी : या दौऱ्यात पंतप्रधान मोदी राज्यातील विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. सुरुवातीला ते तिनसुकिया मेडिकल कॉलेजचं उद्घाटन करतील आणि पीएम-डिव्हाईन योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या शिवसागर मेडिकल कॉलेजची पायाभरणी करतील. त्यानंतर ते 768 कोटी रुपये खर्चाच्या डिगबोई रिफायनरीच्या 0.65 दशलक्ष मेट्रिक टनांवरुन 10 लाख मेट्रिक टनापर्यंतच्या विस्तारासाठी पायाभरणी करतील तसंच 510 कोटी रुपये खर्चून गुवाहाटी रिफायनरी 10 लाख मेट्रिक टनांवरुन 1.2 दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत विस्तारण्यासाठीही पायाभरणी करणार आहेत. यासोबतच 3,992 कोटी रुपये खर्चाच्या बरौनी ते गुवाहाटी पाइपलाइन प्रकल्पाचंही उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. या कार्यक्रमानंतर ते मेलंग मेटेली अथं एका सभेला संबोधित करणार आहेत.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी परदेशी पिता-पुत्रांची अनोखी शक्कल, वाचा कसं गाठलं काझीरंगा पार्क?
  2. महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, सोशल मीडियावर पोस्ट करत 'ही' दिली माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details