PM Modi Bhutan Visit :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी (22 मार्च) भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो' ने सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान मिळवणारे ते परदेशी सरकारचे पहिले प्रमुख आहेत. पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार त्यांच्या 'भारत-भूतान संबंधांच्या विकासातील अतुलनीय योगदान आणि भूतान राष्ट्र आणि तेथील लोकांसाठी त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी' देण्यात आला आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एका पोस्टमध्ये म्हटलंय की, "भूतानकडून 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो' पुरस्कारानं मला सन्मानित करण्यात आलं आहे. मी हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांना समर्पित करतो." भूतानचे राजे जिग्मे खेसर नांग्याल वांगचुक यांनी पंतप्रधान मोदींना 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो' देऊन सन्मानित केले. भूतानच्या राजानं 17 डिसेंबर 2021 रोजी 114 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात या सन्मानाची घोषणा केली होती. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान हा पुरस्कार स्वीकारला.
काय म्हणाले मोदी? : यावेळी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "भारतीय म्हणून माझ्या आयुष्यातील आजचा दिवस मोठा आहे, तुम्ही मला भूतानच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलंय. प्रत्येक पुरस्कार हा स्वतःमध्ये खास असतो, पण जेव्हा आपल्याला दुसऱ्या देशाकडून पुरस्कार मिळतो, तेव्हा आपले दोन्ही देश योग्य दिशेनं वाटचाल करत असल्याचं जाणवतं. 140 कोटी भारतीयांना माहीत आहे की, भूतानचे लोक त्यांच्याच कुटुंबाचे सदस्य आहेत, भूतानच्या लोकांनाही हे माहीत आहे आणि भारत हा त्यांचा परिवार आहे. आमचे संबंध, मैत्री, परस्पर सहकार्य आणि विश्वास अतूट आहे. म्हणूनच आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. भारत आणि भूतानमध्ये समान वारसा आहे. भारत ही भूमी आहे जिथं भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं. तर भूताननं भगवान बुद्धांच्या शिकवणी आत्मसात केल्या आणि त्यांचं जतन केलंय."
हेही वाचा -
- पंतप्रधान मोदींनी मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावं-संजय राऊत - Sanjay Raut news today
- PM Narendra Modi: येत्या पाच वर्षात भारताची सेमीकंडक्टर क्षेत्रात क्रांती दिसेल-पंतप्रधान मोदी
- Uddhav Thackeray : यांची तर औरंगजेबी वृत्ती...; उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर घणाघात