नवी दिल्ली Congress Parliamentary Party General Body Meeting :काँग्रेस संसदीय पक्षाची सर्वसाधारण बैठक 31 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी असतील. दरम्यान, सोमवारी (29 जुलै) विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाभारतातील घटनांचा संदर्भ देत केंद्रीय अर्थसंकल्पावरून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता कॉंग्रसची बैठक होत असल्यानं या बैठकीत मोदी सरकारच्या विरोधात रणनीती आखण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी? : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी संसदेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "मोदी सरकारनं भारताला अभिमन्यूसारख्या चक्रव्यूहात अडकवल्याचा आरोप करत इंडिया आघाडी हे चक्रव्यूह तोडेल," असं ते म्हणाले. लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना राहुल गांधी यांनी असा दावाही केला की, "या अर्थसंकल्पानं काही भांडवलदारांची मक्तेदारी आणि लोकशाही संरचनेला उद्ध्वस्त करणारी राजकीय मक्तेदारी बळकट केलीय. तर तरुण, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांकडं पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलंय. जर इंडिया आघाडी सत्तेवर आली तर जातनिहाय जनगणना करण्यात येईल. तसंच शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी देखील दिली जाईल," असं आश्वासनही यावेळी राहुल गांधी यांनी केलं.