नवी दिल्ली Murugha Mutt Case : चित्रदुर्गातील मुरुगराजेंद्र मठाच्या महंतांविरुद्ध दोन अल्पवयीन पीडित मुलींच्या लैंगिक छळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (23 एप्रिल) सुनावणी झाली. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत दाखल झालेल्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं महंत यांना आठवडाभरात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने महंत शिवमूर्ती मुरुघा शरनारू यांना जामीन मंजूर केला होता.
महंत शिवमूर्तीचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर आपला क्लायंट आत्मसमर्पण करणार असल्याचं सांगितलं होतं. साक्षीदारांची तपासणी पूर्ण होईपर्यंत सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देऊ शकते. खंडपीठानं उच्च न्यायालयाला चार महिन्यांसाठी स्थगिती दिली. याशिवाय, महंत यांना खटल्यादरम्यान सहकार्य करण्याचे आणि अपवादात्मक परिस्थिती वगळता कोणत्याही प्रकारची स्थगिती मागू नये, असे आदेश देण्यात आले होते.
पीडित अल्पवयीन मुली असल्यानं पीडितेच्या वडिलांचे बाजू मांडणाऱ्या अधिवक्ता अपर्णा भट्ट यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांचाही समावेश असलेल्या खंडपीठानं म्हटलं की, 'प्रतिवादी न्यायालयीन कोठडीत असताना, साक्षीदारांची तपासणी करणं योग्य ठरेल.' या प्रकरणात आयपीसी, पॉक्सो आणि इतर कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांसाठी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.