मुंबई Man Arrested For Making Hoax Bomb Call : बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करून पोलिसांची दिशाभूल करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशा प्रकारात अनेकदा अल्पवयीन मुलं तर कधी मानसिक रोगी आढळतात. असाच एक प्रकार मुंबई विमानतळावर घडलाय. एका व्यक्तीनं मुंबई-बंगळुरू विमानात बॉम्ब असल्याचा खोटा दावा केला. त्यामुळं मुंबई विमानतळावर मोठा गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं. अखेर याप्रकरणी बंगळुरू येथून एकाला अटक करण्यात आली आहे. तसंच खोटी माहिती देण्यामागचं कारण विचारलं असता आरोपीनं सांगितलेलं कारण ऐकून पोलीसदेखील चक्रावून गेले आहेत.
काय आहे प्रकरण? : अकासा एअरलाईन्सच्या मालाड येथील कॉल सेंटरला 24 फेब्रुवारीला एक कॉल आला होता. यावेळी एका अनोळखी व्यक्तीनं मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिली. या माहितीनंतर एअरपोर्ट पोलिसांनी गुन्हे शाखा, एटीएस आणि बॉम्बशोधक पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवून संपूर्ण विमानासह प्रवाशांच्या बॅगेची बॉम्बशोधक पथकानं श्वान पथकासोबत तपासणी केली. परंतू विमानात काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळं बॉम्ब ठेवल्याची अफवा असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल क्रमांकाच्या मदतीनं शोध आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसंच याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलंय.