नवी दिल्ली Delhi Fire :नवी दिल्लीच्याअलीपूर भागातील बाजारपेठेत गुरुवारी (15 फेब्रुवारी) संध्याकाळी 5 वाजता भीषण आग लागली. काही वेळातच आगीनं उग्र रूप धारण केलं. या आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे. तर चार जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. अपघातात आणखी काही जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे.
अग्निशामक दलाच्या 22 गाड्या दाखल : आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सुमारे 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं काम सुरूच होतं. अग्निशमन दलानं शुक्रवारी सकाळी आग आटोक्यात आणली. मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात एक केमिकल कारखाना चालवला जात होता. ही आग प्रथम या कारखान्यात लागली आणि नंतर आजूबाजूच्या दुकानांमध्ये पसरली. केमिकलमुळे आग इतक्या वेगानं पसरली. यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. अग्निशमन दलाच्या जवानांनी खबरदारी म्हणून केमिकल कारखाना रिकामा केला आहे. सध्या आगीचं कारण समजू शकलेलं नाही.