नवी दिल्ली Maratha Reservation Row : मराठा आंदोलनासाठी आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडं कूच करत आहेत. तर दुसरीकडं आज मराठा आंदोलनासाठी महत्वाचा दिवस मानला जात आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या क्युरेटीव्ह पिटीशनवर आज महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळं आज मराठा आंदोलनासाठी महत्वाचा दिवस मानला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका :मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला आव्हान देण्यात आल्यानं राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायायलयात टिकलं नाही. त्यामुळं राज्यात पुन्हा मराठा समाज आक्रमक झाला. त्यामुळं राज्यातील महायुतीच्या सरकारनं सर्वोच्च न्यायालयात पुन्हा जाण्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणी क्युरेटीव्ह पिटीशन दाखल करण्यात आली होती. या क्युरेटीव्ह पिटीशनवर आज दुपारी सर्वोच्च न्यायालयात एक वाजता सुनावणी होणार आहे.
बंद दाराआड होणार सुनावणी :राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलं होतं. मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध होत नसल्यानं मराठा समाजाला आरक्षण नाकारण्यात आल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर राज्यात पुन्हा मराठा समाजाचे मोर्चे निघाल्यानं महायुतीच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह पिटीशन दाखल केली. या क्युरेटीव्ह पिटीशनवर आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या पीठात बंद दाराआड होणार आहे.
मनोज जरांगे मुंबईत जाण्यावर ठाम :मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी इथून आंदोलन सुरू करणारे मनोज जरांगे यांनी आता मुंबईकडं आपला मोर्चा वळवला आहे. मुंबईत गेल्याशिवाय मराठा आरक्षण मिळणार नसल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यामुळं मनोज जरांगे लाखो मराठा समाजासह मुंबईकडं निघाले आहेत. मुंबईत जाऊन आमरण उपोषण करण्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.
हेही वाचा :
- मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
- आरक्षणात समानता का नको? मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना सवाल, आंदोलनाची पुढची दिशा 'या' तारखेला ठरणार
- मराठा आरक्षणाला शरद पवार, सुप्रिया सुळेंचा सर्वाधिक विरोध- देवेंद्र फडणवीस