बंगळुरू :फळं आणि भाजीपाला घेऊन जाणारी ट्रक दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 10 व्यापाऱ्यांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना बुधवारी सकाळी उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापुरा तालुक्यातील अरबैल घाटातील कागेरी पेट्रोल पंपाजवळ घडली. विशेष म्हणजे या ट्रकमध्ये तब्बल 40 पेक्षा जास्त व्यापारी प्रवास करत होते.
लॉरीत 40 व्यापारी करत होते प्रवास :हावेरी जिल्ह्यातील सावनुरु इथून भाजीपाला आणि फळं घेऊन ४० हून अधिक व्यापारी उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा मार्केटला जात होते. यावेळी यल्लापुरा इथल्या अरबैल घाटाजवळ ही ट्रक दरीत कोसळला. त्यामुळे ट्रकमधील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेत अनेक व्यापारी गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असं घटनास्थळावरील पोलिसांनी सांगितलं.