नवी दिल्ली Mahatma Gandhi Jayanti 2024 :राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. आज सकाळीच राजघाटावर विविध पक्षातील मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीपुढं नतमस्तक होत आदरांजली अर्पण केली. देशाचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांनाही विजयघाटावर मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जयदीप धनखड, लोकसभा अधयक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी आदरांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी राजघाट इथं जात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल माध्यमांवरही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. " देशातील नागरिकांच्या वतीनं जयंतीनिमित्त परमपूज्य बापूंना शतशत नमन. सत्य, सद्भाव आणि समानतेवर आधारित त्यांचं जीवन आदर्श देशातील नागरिकांसाठी सदैव प्रेरणा बनून राहो," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांनाही आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी सोशल माध्यमांवर, "देश, जवान आणि शेतकऱ्यांसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र श्रद्धांजली."