नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्याबरोबरच उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभेच्या 9 जागांवरच्या पोटनिवडणुकीसाठी आज म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. परंतु मतदानापूर्वीच उत्तर प्रदेश राज्यात बुरखा, हिजाब, नकाब घालण्यावरून गदारोळ झालाय. अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि भाजपा आमनेसामने आलेत. एकीकडे समाजवादी पक्षाने मुस्लिम महिलांचा बुरखा काढून तपासणी करू नये, अशी मागणी केलीय, तर दुसरीकडे भाजपाचे गिरीराज सिंह म्हणाले की, मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराची ओळख पटली पाहिजे. आता हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचलंय. अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षानं निवडणूक आयोगाचं दार ठोठावलंय. समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून मुस्लिम महिलांची बुरखा काढून तपासणी करू नये, अशी मागणी केलीय. मुस्लिम महिला बुरखा घालून मतदानाला गेल्या तर पोलिसांनी त्यांचा बुरखा काढून त्यांना तपासू नये, असं सपाने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटलंय. मतदानादरम्यान मतदारांचे ओळखपत्र तपासण्याचा अधिकार पोलिसांना नसावा, असे समाजवादी पक्षाचे म्हणणं आहे. अशा परिस्थितीत मतदाराचे ओळखपत्र कोण तपासणार? असा प्रश्न उपस्थित होतो. पोलीस महिलांचा बुरखा काढू शकतात का? याबाबत निवडणूक आयोगाचा नियम काय म्हणतो? हे जाणून घेणार आहोत.
निवडणूक आयोगाचा नियम काय? :निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, मतदान करण्यापूर्वी प्रत्येक मतदाराची पडताळणी करणे आवश्यक आहे. बोगस मतदान टाळण्यासाठी प्रत्येक मतदाराला त्याची ओळख पटल्यानंतरच मतदान करण्याची परवानगी दिली जाते. निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी मतदाराचे ओळखपत्र पाहून त्याची ओळख पटवून घेतात. निवडणूक आयोगाचा नियम आहे की, फक्त रिटर्निंग ऑफिसर किंवा पीठासीन अधिकारी तुमचे मतदार ओळखपत्र तपासू शकतात. मात्र, संशयास्पद परिस्थितीत पोलीस किंवा सुरक्षा कर्मचारी मतदाराचे ओळखपत्रही तपासू शकतात.
पोलिंग एजंट तपासू शकतात का? :बूथवर उपस्थित असलेल्या विविध राजकीय पक्षांचे पोलिंग एजंटदेखील कोणत्याही मतदाराचे ओळखपत्र तपासू शकत नाहीत. मात्र, संशय आल्यास ते निवडणूक अधिकाऱ्याला विचारून किंवा प्रश्न उपस्थित करून मतदार ओळखपत्र नक्कीच तपासू शकतात. पोलिंग एजंट फक्त मतदानातील फसवणूक टाळण्यासाठी किंवा सावध करण्यासाठी असतात. पोलीस किंवा सुरक्षा कर्मचारीही मतदार ओळखपत्र तपासू शकत नाहीत. केवळ संशय आल्यास ते तपासू शकतात.
पोलिसांना मतदार कार्ड तपासता येत नाही:निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जारी करून परिस्थिती स्पष्ट केलीय. उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, पोलीस किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांचे काम केवळ सुरक्षा आणि शांतता राखणे आहे. ते कोणत्याही मतदाराचे ओळखपत्र तपासू शकत नाहीत. महिलांचा बुरखा काढूनही पोलीस तिच्या मतदार ओळखपत्राशी तिचा चेहरा जुळतो की नाही हे पाहू शकत नाहीत. पोलीस किंवा सुरक्षा कर्मचारी ओळखपत्रही तपासू शकत नाहीत. कोणत्याही मतदाराचे ओळखपत्र तपासण्याचा अधिकार फक्त रिटर्निंग ऑफिसरला आहे. रिटर्निंग ऑफिसर किंवा पीठासीन अधिकारीच मतदार कार्ड तपासू शकतात.