महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महाकुंभ मेळाव्यात केवळ व्हीआयपीवर लक्ष केंद्रित, राहुल गांधींसह मल्लिकार्जून खर्गे यांची टीका - MAHAKUMBH STAMPEDE NEWS

प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यात दुर्घटना झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली. महाकुंभ मेळाव्यात व्हीआयपीवर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचा काँग्रेसनं आरोप केला.

MahaKumbh Stampede news political reaction
महाकुंभ मेळावा दुर्घटना (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2025, 1:27 PM IST

Updated : Jan 29, 2025, 3:36 PM IST

नवी दिल्ली- महाकुंभ मेळाव्यातील दुर्घटनेवरून ( MahaKumbh Stampede news ) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त करत उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी महाकुंभ मेळाव्यातील व्हीआयपीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली.

राहुल गांधी यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं, "प्रयागराज महाकुंभमेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेक जखमी झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. मी शोकाकुल कुटुंबांबाबत माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो जखमींची तब्येत लवकर सुधारावी, अशी प्रार्थना करतो."

व्हीआयपी संस्कृतीला आळा घाला-राहुल गांधी महाकुंभ मेळाव्यातील व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, " या दुःखद घटनेला व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा, सामान्य भाविकांपेक्षा व्हीआयपीकडे प्रशासनाचे विशेष लक्ष देणं या गोष्टी जबाबदार आहेत. महाकुंभाचे आणखी बरेच दिवस आहेत. तसेच बरेच महास्नान होणार आहेत. आजसारखी दुःखद घटना भविष्यात घडू नये, यासाठी सरकारनं महाकुंभ मेळाव्यातील व्यवस्था सुधारली पाहिजे. व्हीआयपी संस्कृतीला आळा घालून सामान्य भाविकांसाठी चांगल्या व्यवस्था केल्या पाहिजेत."

फक्त ब्रँडिंग आणि मार्केटिंगवर खर्च-उत्तर प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष अजय राय म्हणाले, "प्रयागराजमध्ये कुंभ आणि अर्धकुंभ अनेक वेळा आयोजित करण्यात आले आहेत. परंतु अशी अराजकता यापूर्वी कधीही घडली नाही. योगी सरकारनं सर्व पैसे फक्त ब्रँडिंग आणि मार्केटिंगवर खर्च केले आहेत. येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेवर पैसे खर्च केले नाहीत. महाकुंभाबाबत सरकारची असंवेदनशीलता दिसून येते. अशा घटनांबद्दल आम्ही सतत लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु सरकार आणि प्रशासनानं आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही."

व्हीआयपीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे-मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक्स मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं, "महाकुंभमेळ्यादरम्यान, संगमाच्या काठावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेसाठी अर्धवट व्यवस्था, व्हीआयपी, व्यवस्थापनापेक्षा स्वतःच्या जाहिरीतावर अधिक लक्ष केंद्रित करणं या गोष्टी जबाबदार आहेत. हजारो कोटी रुपये खर्च करूनही अशी व्यवस्था आहे. महाकुंभ मेळाव्यातील व्हीआयपीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे."

सैन्याची मदत घेण्यात यावी-महाकुंभ मेळा परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल शिवसेनेचे यूबीटी प्रवक्ते आनंद दुबे यांनी दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, " मौनी अमावस्येला सुमारे १० कोटी लोक स्नान करणार होते. तेव्हा प्रशासन पोलिसांवर कशामुळे अवलंबून राहिले? प्रशासनानं भारतीय सैन्याची मदत का घेतली नाही? जर सैन्य तिथे असते तर अशी घटना घडली नसती. महाकुंभातील गर्दीचं व्यवस्थापन सैन्याकडं देण्यात यावं."

संपूर्ण भाजपा दिल्लीत प्रचारात गुंग-आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, महाकुंभातील चेंगराचेंगरीची घटना अत्यंत दुःखद आहे. या अपघातात जीव गमावलेल्या भाविकांच्या आत्म्याच्या शांतीसाठी मी प्रार्थना करतो. देव त्यांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि एकमेकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर टीका केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले," सरकारनं चांगली व्यवस्था करायला नको होती का? महाकुंभाच्या व्यवस्थेकडे लक्ष देण्याऐवजी, संपूर्ण भाजपा दिल्लीत प्रचारात गुंग आहे. महाकुंभाच्या चेंगराचेंगरीत जखमी झालेले सर्व भाविक अद्याप रुग्णालयात पोहोचलेले नाहीत. तोवर तुम्ही (पंतप्रधान मोदी) यांनी प्रचार सुरू केला आहे का? तिथे तुमचेच सरकार आहे, कृपया महाकुंभाच्या व्यवस्थेकडेही लक्ष द्या".

राज्यपालांनी व्यक्त केलं दुःख -कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी संवेदना व्यक्त केल्याl. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल नांदेड दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी शोक व्यक्त केला. कुंभ मेळ्यात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त भाविक आल्यानं चेंगराचेंगरी झाल्याचं राज्यपाल म्हणाले. घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबाला दुःख पचवण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना राज्यपालांनी केली.

हेही वाचा-

  1. महाकुंभ मेळाव्यात 3.61 कोटी भाविकांनी केलं अमृत स्नान, चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क
  2. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवात चेंगराचेंगरीची दुर्घटना कशी घडली? जाणून घ्या, प्रत्यक्षदर्शींचा अनुभव
  3. पुण्याहून महाकुंभ मेळाव्याला जाताना कारचा मध्य प्रदेशात अपघात, तिघांचा मृत्यू
Last Updated : Jan 29, 2025, 3:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details