प्रयागराज : संगम शहर प्रयागराजमध्ये 'महाकुंभ 2025' ची सुरुवात व्हायला अवघे काही दिवस उरलेत. यंदा महाकुंभात संगम स्नानासोबतच कुंभ परिसरातील 12 ज्योतिर्लिंगांचंही दर्शन घेता येणार आहे. यासोबतच देशातील 5 प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचा बहुमानही मिळेल.
144 वर्षांनंतर होत आहे महाकुंभ : वास्तविक 144 वर्षांनंतर होत असलेल्या महाकुंभाच्या अध्यात्मिकतेला आणि भव्यतेला नवी उंची देण्यासाठी प्रयागराजमध्ये महापालिकेनं भव्य उद्यान उभारले आहे. सुमारे 400 टन कचऱ्यापासून बनवलेल्या या अनोख्या पार्कमध्ये गंजलेले विजेचे खांब, ट्रक, कार, रिक्षा, पाइप, रेल्वे ट्रॅक यासारखी जुनी वाहनं वापरण्यात आली आहेत.
- 11 एकर जागेवर बांधले शिवालय पार्क : प्रयागराजच्या अरैलमधील हे अनोखे शिवालय पार्क महाकुंभनगरचे क्षेत्र असलेल्या 11 एकर जागेवर बांधण्यात आले आहे. 14 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या उद्यानाची रचना 22 कलाकार आणि 500 कामगारांनी केलीय. वेस्ट एंड वंडर थीमवर बांधलेलं हे उद्यान कला आणि स्वच्छतेचं प्रतीक आहे.
शिवालय पार्कचे तिकीट दर किती? : शिवालय पार्कचे तिकीट दर 50 रुपये आहे. पण, वीकेंडला याच तिकीटाची किंमत 100 रुपये असते. 3 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. तसंच इथं मुलांसाठी स्वतंत्र झोनही तयार करण्यात आलाय. यामध्ये तुळशी व्हॅन आणि संजीवनी व्हॅन, फूड कोर्ट, रेस्टॉरंटचा समावेश आहे. याशिवाय भारताच्या नकाशाच्या सीमेवर प्रतिकात्मक नदी रेखाटण्यात आलीय. या नदीत बोटिंगही करता येते. नौकाविहार करून तुम्ही संपूर्ण देश आणि 12 ज्योतिर्लिंगांची परिक्रमा अनुभवू शकता. ही 12 ज्योतिर्लिंगं भारताच्या नकाशावर ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी बांधण्यात आली आहेत. हा जलाशय 600 मीटर लांब आहे.