प्रयागराज (लखनौ) -महाकुंभ मेळाव्यात ( mahakumbh 2025) येणाऱ्या भाविकांना रेल्वेचं तिकीट बुक करण्यासाठी रेल्वेकडून क्यूआर कोड स्कॅनची सुविधा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही क्युआर कोड हा रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जॅकेटवर असणार आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्याचं जानेवारीत आयोजन होणार आहे. हा महाकुंभ मेळावा बारा वर्षांतून एकदा येतो. त्यासाठी करोडो भाविक येतात, हे लक्षात घेऊन प्रशासनाला मोठी तयारी करावी लागत आहे. महाकुंभमध्ये रेल्वेचं तिकीट आरक्षित करण्यासाठी रेल्वे स्थानकांसह महत्त्वाच्या ठिकाणी रेल्वे कर्मचारी तैनात असणार आहेत. भाविकांना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जॅकेटवर घातलेल्या स्कॅनरचा वापर करून तिकीट काढणार आहेत. यापूर्वी रेल्वेनं भाविकांसाठी 13 हजार विशेष गाड्या सुरू केल्या आहेत.
- तिकीट काढणं सोपे होणार-प्रयागराज हे उत्तर मध्य रेल्वे (NCR) झोनच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येते. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तिकीट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विभागीय रेल्वेनं जॅकेटवरून स्कॅन सुरू करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
QR कोड स्कॅनरद्वारे तिकीट कसे बुक करावे?तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांना फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हिरव्या जॅकेटवरील QR कोड स्कॅन करावा लागेल. स्कॅन केल्यानंतर, त्यांना त्यांच्या स्मार्टफोनवर अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) मोबाइल अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक मिळेल. याद्वारे प्रवासी तिकीट काढू शकतात. तसेच इतर सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
भाविकांची गर्दीपासून सुटका होणार-महाकुंभादरम्यान रेल्वे स्थानकावर लांबच लांब रांगा लागणार आहेत. अशा स्थितीत डिजिटल पेमेंटद्वारे तिकीट बुक केल्यानं भाविकांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच महाकुंभदरम्यान येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दीपासून सुटका होणार आहे. नवीन उपक्रम डिजिटल इंडियाच्या दिशेने टाकलेले पाऊल ठरेल आणि महाकुंभ 2025 साठी येणाऱ्या भाविकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरेल.