भुवनेश्वर Lok Sabha Elections 2024 : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज (17 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेत आगामी निवडणुकांविषयी भाष्य केलं आहे. "आम्ही 2024 मध्ये संसदीय आणि राज्य विधानसभा निवडणुका घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. या निवडणुकींची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त :यावेळी बोलत असताना राजीव कुमार म्हणाले की, "50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा असणार आहेत. 37809 मतदान केंद्रांपैकी 22,685 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था असेल. तसंच काही समस्या आल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. दिव्यांग व्यक्ती, तरुण आणि महिलांवर मुख्य लक्ष केंद्रित केलं जाणार असून यासाठी 300 मतदान केंद्रे असणार आहेत. त्याचे व्यवस्थापन दिव्यांग व्यक्तींद्वारे केलं जाईल."
700 बूथवर युवक कर्मचारी तैनात केले जाणार आहेत, याचं कारण म्हणजे जेव्हा युवावर्ग मतदानासाठी येईल तेव्हा त्यांना असं वाटेल की आमच्यासारखंच कोणीतरी आमचं मतदान घेतंय. -राजीव कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त
13 मार्चला जम्मू-काश्मीरला देणार भेट : मुख्य निवडणूक आयुक्तांनी ओडिशाला भेट देऊन लोकसभा निवडणुकीसाठी राज्यांच्या तयारीचा आढावा घेणं पुन्हा एकदा सुरू केलं आहे. जानेवारीमध्ये आयोगानं आंध्र प्रदेशातील तयारीचा आढावा घेतला होता. आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहेत. तर पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेश याशिवाय आयोग इतर राज्यांनाही लवकरच भेट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच 13 मार्चला निवडणूक आयोग जम्मू-काश्मीरला भेट देणार आहे.
किती टप्प्यात होणार मतदान? : 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 9 टप्प्यात मतदान झालं होतं. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 7 टप्प्यात मतदान झालं. आता 2024 च्या लोकसभा निवडणुका किती टप्प्यात होतील याची अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाईल.
हेही वाचा -
- आदित्य ठाकरे शिवडी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार? काय आहेत कारणं? जाणून घ्या
- पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती; तरीही लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम
- लोकसभा निवडणुकीच्या कामामुळे हजारो विद्यार्थी रामभरोसे? राज्यातील शिक्षकांसमोर यक्षप्रश्न