नवी दिल्ली Mahua Moitra Cash For Query Case :कॅश फोर क्वेरी प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यानंतरही मोहुआ मोईत्रा यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आता महुआ मोईत्रा यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश लोकपालांनी दिले आहेत. त्यामुळे महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
लोकपालांनी सीबीआयला दिले चौकशीचे आदेश :महुआ मोईत्रा यांच्या कॅश फोर क्वेरी प्रकरणात त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आता पुन्हा लोकपाल यांनी महुआ मोईत्रांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. सीबीआनं कलम 20 ( 3 ) अ नुसार महुआ मोईत्रांवरील आरोपांची चौकशी करुन सहा महिन्यात अहवाल सादर करावा, असे आदेश लोकपालांनी दिले आहेत. सीबीआयनं दर महिन्याला तपासाचा प्रगती अहवाल लोकपालांकडं सादर करावा, असे आदेशही लोकपालांनी दिले आहेत.
महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द :तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मोहुआ मोईत्रा यांनी पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचं प्रकरण संसदेत चांगलंच गाजलं. त्यांच्या या प्रकरणामुळे संसदेच्या समितीनं दिलेल्या चौकशी अहवालामुळे महुआ मोईत्रा यांची खासदराकी रद्द करण्यात आली. महुआ मोईत्रा यांनी संसदेच्या साईटचा पासवर्ड एका उद्योगपतीला दिल्याचं उघड झाल्यानंतर हे प्रकरण बाहेर आलं होतं.
खासदारांविरोधात गंभीर आरोप असल्यानं चौकशी गरजेची :"तृणमूल काँग्रसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात लावण्यात आलेले आरोप गंभीर आहेत. त्यासह संसदेच्या सत्यशोधन समितीनं त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपात तथ्य असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात सीबीआयनं चौकसी करावी," असं लोकपालांनी आपल्या आदेशात नमूद केलं आहे.
हेही वाचा :
- "आता महाभारताचं युद्ध पाहा", हकालपट्टीनंतर महुआ मोईत्रा यांची 'ती' प्रतिक्रिया चर्चेत; वाचा काय आहे प्रकरण
- खासदार महुआ मोईत्रा यांची संसदेतून हकालपट्टी, विरोधकांचा सभात्याग
- हिरानंदानी ग्रूपच्या मुख्यालयासह अनेक कार्यालयांवर ईडीची छापेमारी, कारण काय?