सहारनपूर :Lok Sabha Election 2024 : भारताला मजबूत देश बनवणं ही भाजपाची वचनबद्धता आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. भाजपाच्या हेतूनुसार, निष्ठेनुसार धोरणंही तशीच बनवली जातात. त्यामुळेच आज प्रत्येक भारतीय अनुभवातून सांगत आहे की, हेतू बरोबर असतील तर परिणाम योग्यच असतात. तसंच, भाजपा सरकार भेदभाव न करता काम करतं. शासनाच्या योजना प्रत्येक वर्ग, प्रत्येक जाती, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हा आमचा विचार आहे. त्यामुळे भाजपा सरकारने 10 वर्षे पूर्ण ताकदीने काम केलं आहे. (Lok Sabha election) भाजपा देशातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या कमी करत आहे. प्रत्येकासाठी नवीन संधी निर्माण करणं हे आपलं काम असल्याचं मोदी म्हणाले. सहारनपूरचे लाकूड कोरीव काम आणि तेथील लोकांचे कौशल्य दूरवर प्रसिद्ध आहे. त्यामुळे योगी असो वा मोदी, आम्हाला तुमची काळजी आहे. म्हणूनच आम्ही दोघंही एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो 'व्होकल फॉर लोकल' असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणालेत.
'मेहनतीत कोणतीही कसर ठेवली नाही' : "10 वर्षांपूर्वी मी सहारनपूरला निवडणूक रॅलीसाठी आलो होतो. त्यावेळी देश प्रचंड निराशेच्या आणि संकटाच्या काळातून जात होता. तेव्हा मी तुम्हाला हमी दिली होती की, मी देश झुकू देणार नाही, देश थांबू देणार नाही. मी संकल्प केला होता की तुमच्या आशीर्वादाने मी प्रत्येक परिस्थिती बदलेन, निराशेला आशेत बदलेन. तुम्ही तुमच्या आशीर्वादात कोणतीही कसर ठेवली नाही आणि मोदींनी त्यांच्या मेहनतीत कोणतीही कसर ठेवली नाही असा दावाही मोदींनी यावेळी उपस्थितांसमोर केला आहे.
शक्ती कोणी संपवू शकेल का : शक्तीशी लढण्याच्या वक्तव्यावरून विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले, आमचं हे स्थान मातृशक्तीचं स्थान आहे. आमचं हे स्थान मातृशक्तीचं पूजन आहे आणि भारताच्या कानाकोपऱ्यात शक्तीची उपासना ही आमची नैसर्गिक गोष्ट आहे. आध्यात्मिक प्रवासाचा एक भाग आहे. आपण तो देश आहोत जो शक्तीपूजेला कधीही नाकारत नाही. पण इंडी अलायन्सचे लोक आपला लढा शक्तीविरुद्ध असल्याचं उघड आव्हान देत आहेत, हे देशाचं दुर्दैव आहे. शक्ती कोणी संपवू शकेल का? ताकदवानांना कोणी आव्हान देऊ शकेल का? ज्यांनी शक्ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांच्या नशिबी इतिहासात आणि पुराणात नोंद आहे असंही मोदी यावेळी मोदी म्हणाले.