हैदराबाद Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या 1 जून रोजी होणाऱ्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदानासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी केलीय. लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 486 जागांवर सहा टप्प्यांत मतदान पूर्ण झालं आहे. आता शेवटच्या टप्प्यात केवळ 57 जागांवर निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीबाबत आतापर्यंत राजकीय विश्लेषकांचे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले आहेत. सुप्रसिद्ध गुंतवणूकदार तसंच लेखक रुचिर शर्मा यांनी महाराष्ट्रात अतितटीचा सामना होणार असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात भाजपाच्या दोन मित्रपक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला धक्का बसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आंध्र प्रदेश वगळता बिहार, कर्नाटक, महाराष्ट्रात भाजपाचे मित्रपक्ष लोकसभा निवडणुकीत अत्यंत खराब कामगिरी करत आहेत, असं त्यांचं मत आहे.
महाविकास आघाडीला राज्यात निम्म्या जागा : रुचिर शर्मा गेल्या दोन दशकांपासून देशातील निवडणुकांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी ओळखले जातात. निवडणुकांसंदर्भात रुचिर शर्मा यांचा दांडगा अभ्यास आहे. एका प्रसारमाध्यम कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, "कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानं महाराष्ट्रातील शेतकरी संतप्त आहेत. ही बंदी सुमारे 6 महिने होती. त्यामुळं राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला निम्म्या जागा मिळू शकतात. परंतु, खरं नुकसान भाजपाच्या मित्रपक्षांना अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला होणार आहे." छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सोलापूर येथील पत्रकार, उद्योगपतींची भेट घेऊन हे मूल्यमापन केल्याचं त्यांनी सांगितलं.