अमरावती- पर्यटन म्हणजे काही जणांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. विशेष म्हणजे एकाच शाळेत नोकरी करणारे नेपाळमधील सात शिक्षक कुंभमेळाच्या निमित्तानं भारतात आलेत. कोलकाता येथून थेट दक्षिण भारतात असणाऱ्या विशाखापट्टणमचा समुद्र, हैदराबाद येथील चारमिनार, महाराष्ट्रातील वेरूळ लेणी आणि मध्य प्रदेशातील खजुराहो लेणी, असा पर्यटनाचा आनंद घेत ते प्रयागराजमधील आयोजित कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. कुणी 78 वर्षांचा आहे, तर कुणी 75 गाठलेली आहे. दोघं-तिघं 70 ते 71 वर्षे वयोगटातील आहे, तर एक जण गतवर्षीच सेवानिवृत्त झालाय. भारतातील कुंभमेळ्यात सलग दुसऱ्या वर्षी हे वयोवृद्ध शिक्षक सहभागी होत भारत भ्रमणाचा आनंद घेत आहेत. अगदी शाळकरी विद्यार्थ्यांसारखी धमाल-मस्ती करीत भारत भ्रमणावर आलेल्या या सेवानिवृत्त नेपाळी शिक्षकांच्या आनंददायी प्रवासासंदर्भात "ईटीव्ही भारत"चा हा स्पेशल रिपोर्ट.
एकाच शाळेतून सहा जण झाले निवृत्त : नेपाळच्या कोशी प्रांतात असणाऱ्या झापा जिल्ह्यात बुद्धशांती या गावात असणाऱ्या त्रिभुवन माध्यमिक शाळेतून 15 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेले गदाधर कापले, 12 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेले बसंत कुमार तिमसेना यांच्यासह माधव प्रसाद अधिकारी, लीलाप्रसाद सत्यपाल, ध्रुवलाल रेगमी, नरेंद्र कुमार बराल आणि प्रेम प्रसाद सलकोटा हे भारतात आलेत. हे सात शिक्षक शाळेतही मित्रांसारखे एकत्र होते, तसेच आता सेवानिवृत्तीनंतर सोबतच सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याचा आनंद घेत आहेत.
विशाखापट्टणमवरून पर्यटनाला सुरुवात : नेपाळवरून प्रयागराज जवळ असलं तरी आम्हाला भारतातील काही ठिकाणं पाहायची होती. त्यामुळं आमच्या प्रवासाची सुरुवात ही आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून झालीय. आमच्या नेपाळमध्ये समुद्र नाही, त्यामुळं जहाज कधी पाहिलं नाही. विशाखापट्टणम येथे पहिल्यांदा समुद्रात जहाज पाहिल्याचा आनंद बसंतकुमार तिमसेना यांनी" ईटीव्ही भारत"शी बोलताना व्यक्त केलाय. विशाखापट्टणम येथे आम्ही निसर्गांनं समृद्ध प्रदेश, धार्मिक स्थळं पाहिलीत आणि माझी श्रद्धा असणाऱ्या मेहरबाबा यांच्या आश्रमात आम्ही अचानक पोहोचलो, याचादेखील आनंद झाल्याचं बसंतकुमार तिमसेना म्हणालेत.
चारमिनार आणि वेरूळची लेणी पाहून थक्क : विशाखापट्टणमवरून आम्ही हैदराबादला आलोय. लहानपणापासून हैदराबादच्या चारमिनारबाबत ऐकून होतो. चारमिनार आम्ही प्रत्यक्षात पाहिला आणि त्यानंतर हैदराबाद येथील भव्य असा गोवळकोंडा किल्ला आम्ही पाहून आलोय. त्यानंतर आम्ही औरंगाबादला येऊन अजिंठा आणि वेरूळची लेणी पाहिली. हजारो वर्षांपूर्वीची कलाकृती, त्या काळातील अभियांत्रिकी शास्त्र पाहून आम्ही अगदी चकित झाल्याचा भाव बसंतकुमार तिमसेना यांनी व्यक्त केलाय.
अयोध्येतील राम मंदिर पाहून घरी परतणार : आम्ही आता खजुराहो येथील गुंफा पाहायला जात आहोत. खजुराहो येथील कलाकृती पाहिल्यावर मंगळवारी सायंकाळपर्यंत कुंभमेळ्यात जाऊ. कुंभमेळ्यात आम्ही स्नान करणार आहोत. अयोध्येत श्रीराम मंदिर आम्हाला पाहायचं आहे. अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेतल्यावर आम्ही नेपाळमधील आपल्या गावी परत जाऊ, असं बसंतकुमार तिमसेना म्हणालेत.
12 वर्षांपूर्वी आले होते नाशिकला : सेवानिवृत्त शिक्षकांची ही टीम बारा वर्षांपूर्वी नसिक येथे आयोजित सिंहस्थ कुंभ मेळाव्यात देखील आली होती. त्यावेळी सात ऐवजी पाच सेवानिवृत्त शिक्षक सोबत होते. आता बारा वर्षात आणखी दोघं सेवानिवृत्त झाल्यामुळं या टीममध्ये सहभागी झालेत. सेवानिवृत्त झालो, म्हातारपण आलं यामुळं घरात बसून राहण्यापेक्षा आम्ही फिरण्याला महत्त्व देतो आणि भारतात फिरणं आमच्यासाठी अतिशय आनंददायी असल्याची प्रतिक्रिया गजाधर काफले यांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना दिली.
अमेरिका आणि दुबईची केली सैर : कुंभमेळ्याच्या निमित्ताने भारतात आलेल्या नेपाळमधील सात सेवानिवृत्त शिक्षकांपैकी गजाधर काफले यांनी दोन वेळा अमेरिका आणि बसंतकुमार तिमसेना यांनी दुबईची देखील दोन वेळा सैर केलीय. मुलगा अमेरिकेत वास्तव्याला असल्यामुळं मी दोनदा अमेरिका फिरून आलोय, असं गजाधर काफले सांगतात. माझा मुलगा दुबईत असल्यानं मी दुबईला जाऊन आलोय, असं बसंतकुमार तिमसेना म्हणालेत. घरात एकटं राहण्यापेक्षा फिरण्याचा आनंद घ्यावा, असं या सातही सेवानिवृत्त शिक्षकांचे म्हणणं आहे. आमचा धर्म, संस्कृती भाषा हे सारं काही भारताशी साम्य राखणारं असल्यामुळं आम्हाला भारतात फिरायला आवडतं, अशी भावनादेखील या सेवानिवृत्त शिक्षकांनी व्यक्त केलीय.
हेही वाचा -