मुंबई Lok Sabha Election 2024 : भाजपानं रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपानं आपली यादी आज जाहीर केली, या यादीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजपानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली. नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केल्यानं आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात नारायण राणे यांचा विनायक राऊत यांच्याशी सामना रंगणार आहे. त्यामुळे कोकणातील राजकारणात दोन परंपरागत विरोधकांची लढत रंगणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
भाजपानं जाहीर केली 13 वी यादी :लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सध्या देशभरात रंगली आहे. लोकसभेची उमेदवारी मिळण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठी तयारी केली. मात्र जागा वाटपाचं घोडं अडल्यानं उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत अनेक नेत्यांना साशंकता होती. असं असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्यालाच महायुतीची उमेदवारी मिळणार असा दावा केला होता. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना आव्हान दिलं होतं. महाविकास आगाडीचे नेतेही नारायण राणे यांना उमेदवारी मिळणार नसल्याचा दावा करत होते. अखेर भाजपानं नारायण राणे यांनाच उमेदवारी बहाल केल्यानं नारायण राणे यांचा दावा खरा ठरला. भाजपानं आपली 13 वी यादी जाहीर करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.