नवी दिल्ली LK Advani Reaction :भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात येणार आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केलीय. माजी उपपंतप्रधानांना देशाच्या सर्वात मोठ्या सन्मानानं सन्मानित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. 96 वर्षीय अडवाणी यांनी स्वत: या संदर्भात एक निवेदन जारी करत आपली प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, "मी पूर्ण नम्रतेनं आणि कृतज्ञतेनं हा सन्मान स्वीकारतो."
काय म्हणाले लालकृष्ण अडवाणी : भारतरत्न जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय की, "आज मला जाहीर झालेला 'भारतरत्न' मी अत्यंत नम्रतेनं आणि कृतज्ञतेनं स्वीकारत आहे. हा केवळ एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठीच नाही, तर त्या आदर्शांचाही सन्मान आहे, जे वापरुन मी आयुष्यभर माझ्या क्षमतेनुसार सेवा करण्याचा प्रयत्न केला."
माझं जीवन माझ्या राष्ट्रासाठी :पुढं निवेदनात अडवाणी म्हणाले, "मी वयाच्या 14 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून सामील झालो. तेव्हापासून माझी एकच इच्छा होती. आयुष्यात जे काही कार्य माझ्यावर सोपवण्यात आलंय, त्यात माझ्या प्रिय देशासाठी स्वत:ला समर्पित करावं. 'इदम् न मम' हे ब्रीदवाक्य म्हणजे माझ्या आयुष्याला प्रेरणा देणारी गोष्ट आहे. म्हणजे 'हे जीवन माझं नाही. माझं जीवन माझ्या राष्ट्रासाठी आहे."