मुंबई Bharat Ratna : देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावर्षी आतापर्यंत 5 जणांना हा पुरस्कार जाहीर झाला. हे निवडणुकीचं वर्ष आहे, त्यामुळे यावर चर्चा होणार हे नक्कीच. भारतरत्नशी संबंधित अनेक मनोरंजक गोष्टी आहेत ज्या फार कमी लोकांना माहित असतील.
आतापर्यंत 48 व्यक्तींना भारतरत्न : 1954 साली देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी या पुरस्काराची सुरुवात केली. आतापर्यंत 48 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आलं आहे. 2024 मध्ये आणखी 5 व्यक्तींची नावे जोडली गेली. त्यामुळे आता भारतरत्नांची संख्या 53 वर पोहोचेली आहे. देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला विशेष पदक आणि प्रमाणपत्र दिलं जातं. भारतरत्न सोबत कोणतंही रोख पारितोषिक दिलं जात नाही, कारण या पुरस्काराची किंमत अमूल्य आहे.
फक्त पंतप्रधान राष्ट्रपतींना शिफारस करतात : पिंपळाच्या पानाच्या आकारातील भारतरत्न पदक 59 मिमी लांब, 48 मिमी रुंद आणि 3.2 मिमी जाड आहे. यावर एक सूर्य आहे, ज्याच्या खाली देवनागरीमध्ये 'भारतरत्न' लिहिलंय. पदकाच्या मागील बाजूस भारताचं राष्ट्रीय चिन्ह (चार सिंह) आणि त्याखाली 'सत्यमेव जयते' हे राष्ट्रीय बोधवाक्य लिहिलेलं आहे. पद्म पुरस्कार, क्रीडा पुरस्कार, शौर्य पुरस्कार किंवा इतर कोणत्याही सन्मानासाठी शिफारसी राज्य सरकारं, विभाग इत्यादी करतात परंतु भारतरत्नसाठी फक्त देशाचे पंतप्रधान राष्ट्रपतींना शिफारस करतात. यासाठी इतर कोणत्याही औपचारिक शिफारशीची आवश्यकता नाही.
9 पंतप्रधान, 6 राष्ट्रपतींना सन्मान मिळाला : कोणत्याही विशिष्ट क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान, सेवेसाठी किंवा कामगिरीसाठी भारतरत्न दिला जात असला तरी, हा सन्मान मिळालेल्या बहुतेक व्यक्ती राजकारणाशी संबंधित आहेत. आतापर्यंत 9 पंतप्रधान आणि 6 राष्ट्रपतींना हा सन्मान मिळाला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांना पंतप्रधान असताना हा सन्मान मिळाला होता.
पहिला भारतरत्न कोणाला : 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार सी. राजगोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन यांना देण्यात आला. सी. राजगोपालाचारी हे देशातील प्रसिद्ध राजकारणी, मद्रास प्रेसिडेन्सी आणि मद्रास राज्याचे मुख्यमंत्री, वकील आणि स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांची जयंती (5 सप्टेंबर) दरवर्षी 'शिक्षक दिन' म्हणून साजरी केली जातो. तर महान शास्त्रज्ञ सीव्ही रमण यांना 1930 साली नोबेल पारितोषिक मिळालं होतं.
सर्वात तरुण भारतरत्न : महान फलंदाज सचिन तेंडुलकरला 2014 साली 'भारतरत्न पुरस्कार' देण्यात आला. एखाद्या खेळाडूला सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची ही पहिलीच वेळ होती. क्रिकेटच्या मैदानावर देवाचा दर्जा मिळवणारा सचिन हा सन्मान मिळवणारा देशातील पहिला आणि आत्तापर्यंतचा एकमेव खेळाडू आहे. तसेच तो भारतरत्न मिळवणारा सर्वात तरुण व्यक्ती आहे. त्याला वयाच्या 40 व्या वर्षी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
सर्वात वृद्ध भारतरत्न : महाराष्ट्रातील महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. तेव्हा ते 100 वर्षांचे होते. धोंडो केशव कर्वे हे प्रसिद्ध समाजसुधारक होते. त्यांनी महिलांच्या उत्थानासाठी अनेक कामं केली. यात स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह यासारख्या सुधारणांचा समावेश आहे.
एका पाकिस्तानी व्यक्तीलाही मिळाला भारतरत्न : अनेकांना वाटतं की भारतरत्न फक्त भारतीयांनाच दिला जातो. मात्र तसं अजिबात नाही. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त करणाऱ्यांच्या यादीत एका पाकिस्तानी व्यक्तीचाही समावेश आहे. अब्दुल गफ्फार खान यांना 1987 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. ब्रिटिशांविरुद्ध लढण्यापासून ते पाकिस्तानी सरकारविरुद्ध अहिंसक चळवळी चालवण्यापर्यंत ते हिंदू-मुस्लिम बंधुभावाचे समर्थक होते. अब्दुल गफ्फार यांनी स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींचीही साथ दिली होती. ते नेहमी अहिंसेचा झेंडा फडकवणारे 'फ्रंटियर गांधी' म्हणून ओळखले जातात.
नेल्सन मंडेला आणि मदर तेरेसा : वर्णभेदाविरोधात लढणारे दक्षिण आफ्रिकेचे पहिले राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना 1990 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. अहिंसेचे पुरस्कर्ते नेल्सन मंडेला यांचच्यावर महात्मा गांधींचा खूप प्रभाव होता. तर कुष्ठरुग्ण आणि अनाथांच्या सेवेसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या मदर तेरेसा यांना 1980 मध्ये भारतरत्न देण्यात आला.
जेव्हा भारतरत्न जाहीर झाला पण दिला गेला नाही : वर्ष 1992 मध्ये एक प्रसंग आला जेव्हा पंतप्रधानांनी भारतरत्न देण्यासाठी एका व्यक्तीच्या नावाची घोषणा केली, मात्र त्यांना तो सन्मान मिळू शकला नाही. तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांनी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मांडला होता. सरकारला सुभाषचंद्र बोस यांना हा सन्मान मरणोत्तर द्यायचा होता. मात्र नेताजींचं कुटुंबीय त्यांच्या मृत्यूच्या पुष्टीबाबत सहमत नव्हतं. सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबत अनेक दशकांपासून वाद सुरू आहेत.
नावाच्या पुढे किंवा मागे 'भारतरत्न' लिहिता येत नाही : आत्तापर्यंत 50 हून अधिक व्यक्तींना हा सन्मान मिळाला आहे, परंतु घटनेच्या कलम 18(1) नुसार हा पुरस्कार मिळवणारा कोणीही त्याच्या नावाच्या पुढे किंवा मागे 'भारतरत्न' लिहू शकत नाही. तथापि, ते त्यांच्या व्हिजिटिंग कार्डवर, बायोडेटा किंवा लेटरहेडवर 'राष्ट्रपतींकडून पुरस्कार प्राप्त भारतरत्न' किंवा 'भारतरत्न प्राप्तकर्ता' लिहू शकतात.
2024 मध्ये 5 नावांची घोषणा : एका वर्षात जास्तीत जास्त 3 भारतरत्न देण्याची परंपरा असली तरी 2024 या वर्षात आतापर्यंत 5 नावांची घोषणा करण्यात आली आहे. यावरून राजकारणही चांगलंच तापलंय. तसं पाहिलं तर, 1999 मध्येही चार भारतरत्न देण्यात आले होते. तेव्हा जयप्रकाश नारायण, अमर्त्य सेन, रविशंकर आणि गोपीनाथ बोरदोलोई यांना हा सन्मान मिळाला होता. शुक्रवार, 9 फेब्रुवारीला माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. काही दिवसांपूर्वी लालकृष्ण अडवाणी आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली होती.
हे वाचलंत का :
- 17 दिवसांत 5 जणांचा सन्मान, आता 'भारतरत्न'चंही राजकीयकरण होतंय का?